आॅडिओ टेप्समुळे नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्या इशाºयावरून गुजरात सरकारने पाळत ठेवलेल्या त्या महिलेची हेरगिरी प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. १५ नोव्हेंबर रोजी कोब्रा पोस्ट या संकेतस्थळावर पहिल्यांदा हे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर त्या महिलेसोबतचे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र गुलेल या वेबसाइटने प्रसिद्ध केले होते.

आता याच संकेतस्थळाने या हेरगिरीच्या ३९ नवीन वेगवेगळ्या आॅडिओ टेप्स प्रसिद्ध केल्या आहेत. यात गुजरात पोलिसांनी राज्याच्या सीमा ओलांडून बंगळुरू येथेही त्या तरुणीची २००९ मध्ये येदुरप्पा सरकारच्या काळात हेरगिरी केल्याचा दावा गुलेल या संकेतस्थळाने केला आहे. त्या महिला वास्तुविशारदाचे मोबाइल संभाषण चोरून ऐकण्यासाठी खासगी मोबाइल कंपन्यांच्या अधिकाºयांनीही गुजरात पोलिसांशी हात मिळवणी केल्याचे गुलेलने म्हटले आहे. तसेच गुजरातच्या गृहसचिवांची परवानगी न घेताच त्या तरुणीचा फोन टॅप करण्यात आल्याचे पुरावेही या संकेतस्थळाने दिले आहेत.

नव्या आॅडिओ टेप्समध्ये गुजरातमधील आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल आणि अन्य एक आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांच्या संभाषणाचा समावेश आहे. सिंघल हे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपी आहेत तर त्यावेळी गुप्तचर विभागाच्या महानिरीक्षकपदावर असलेले शर्मा सध्या अहमदाबादमध्ये गुन्हे शाखेचे सहआयुक्त आहेत. सीबीआयने जून महिन्यात २६७ टेप्स जप्त केल्या आहेत. त्यानंतरही आणखी नवीन धक्कादायक टेप्स आपल्याकडे असल्याचा दावा गुलेलने केला आहे.

Leave a Comment