‘आप’ला सत्ते पासून रोखण्याचा भाजपचा प्रयत्न

नवी दिल्ली: दिल्लीअत आम आदमी पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या तीन आमदारांना कोट्यवधी रुपये देऊ केल्याचीही दिल्लीत चर्चा आहे. आम आदमी पार्टीच्या नैतिकतेमुळे दिल्लीत घोडेबाजार होणार नाही अशी आशा होती. पण ऐनवेळी सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने पैशांचा खेळ खेळल्याची चर्चा आहे. त्याहमुळे आता आगामी काळात सरकार कोणाचे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजप हे सरकारच्या म्हणजे आम आदमी पक्षाच्या विरोधात मतदान करेल. शिवाय फितवलेले तीन आमदारही आम आदमी पक्षाच्या विरोधात मतदान करतील. अशा स्थितीत केजरीवाल यांचं सरकार पडेल आणि भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळेल.

दिल्लीतील सत्ता स्थापनेवरुन दिवसभरात दोलायमान स्थिती निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. कधी काँग्रेसचे सर्व आमदार आम आदमी पक्षाच्या बाजूने मतदान करतील अशी बातमी येते. तर कधी काँग्रेसचे तीन आमदार आम आदमी पक्षाच्या विरोधात मतदान करतील अशीही बातमी येत आहे. मात्र आमचे सर्व आमदार आपला मतदान करणार असल्याचं काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा झाली असून सर्वजण आपसोबत असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.