चंडीगढ – आम आदमी पार्टीने दिल्लीतल्या विजयानंतर हरियानाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली असून येत्या ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या घोषणेची दखल घेऊन कॉंग्रेस पक्षाने संघटनात्मक डागडुजी सुरू केली असून त्याची सुरुवात म्हणून प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर नवीन व्यक्तीला नेमण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. सध्या प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून ङ्गुलचंद मुल्लाना हे कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या जागी आता युवक कॉंग्रेसचे नेते खासदार अशोक तन्वर यांना नेमण्याचा विचार सुरू झाला आहे.
हरियाना हे दिल्लीला लगत असलेले राज्य आहे आणि दिल्लीत कार्यरत असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये हरियानातील कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचे बरेच नातेवाईक हरियानामध्येच स्थित असून त्यांचा मोठा प्रभाव भिवानी जिल्ह्यामध्ये आहे. गतवर्षी हिस्सार लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीने कॉंग्रेसच्या विरोधात उघडपणे प्रचार केला. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार केवळ पराभूतच झाला असे नाही तर तिसर्या क्रमांकावर राहून अनामत रक्कम गमावून बसला.
हरियानामध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला निसटते बहुमत मिळाले होते. हरियाना जनहित कॉंग्रेस या पक्षाचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांचा आधार घेऊन पक्षाने कसेबसे बहुमत मिळवले होते. आता हरियाना जनहित कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्याशिवाय मुख्य विरोधी पक्ष असलेल्या इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाचाही प्रभाव राज्यात आहे. त्यात आता आम आदमी पार्टीची भर पडल्यास कॉंग्रेसला अनेक आघाड्यांवर आव्हाने झेलावी लागणार आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष ङ्गुलचंद मुल्लाना २००७ पासून या पदावर आहेत. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला सतत पराभवच पत्करावे लागले आहेत.