अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड

मुंबई – जो अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या मागे – पुढे फिरून राजकारणात मोठा झाला आणि त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभचे राहते घर अमर सिंग यांनी वाचवले तरीही तो त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभने बाळासाहेब ठाकरेंना कायम आपण तुमच्या कुटुंबाचा भाग आहोत, असे सांगितले व त्यांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच राज ठाकरेंच्या वळचणीला गेले असा माणूस राज ठाकरेंचा तरी काय होणार, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेतून उमटते आहे.

अमिताभ बच्चन यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला बोलावून ह्यझाले गेले गंगेला मिळालेह्ण, असे म्हणत राज यांनी उद्धव यांना राजकीय शह देण्याचा प्रयत्न सोमवारी केला. यावर उद्धव जोवर काही भूमिका घेत नाहीत तोवर आपण काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया सेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराने दिली आहे. जोवर शिवसेना या चार अक्षरांवर सामान्य शिवसैनिकाचे प्रेम आहे व उद्धव यांच्या नेतृत्वाखाली ते एकदिलाने काम करीत आहेत तोवर असे किती अमिताभ आले किंवा गेले तरी काही फरक पडत नाही.

राज ठाकरे यांची गुजरातची जाहिरात करणाºया अमिताभ यांच्याबरोबरची सलगी काही वेगळ्या राजकीय कारणांमुळेही असू शकते असे ही ते म्हणाले. दरम्यान, मनसेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका अद्याप बदललेली नाही. काल झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी आपण मराठीच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगितले. असे असताना अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळायला हवे होते, असे आझमी म्हणाले.

Leave a Comment