कैरो – इजिप्तमध्ये सर्वात जुनी संगठीत पार्टी मुस्लीम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना म्हणून मंगळवारी घोषित करण्यात आले आहे. मंगळवारी येथील पोलिस मुख्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हंगामी पंतप्रधान हाजिम अल बेबलावी यांनी ही घोषणा केली आहे. या बॉम्बस्फोटात १४ जण ठार तर १३४ जण जखमी झाले होते आणि हा स्फोट मुस्लीम ब्रदरहूडनेच केला असल्याचा पंतप्रधानांनी दावा केला आहे.
इजिप्तच्या मनसौरा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या बहुमजली इमारतीत हा स्फोट घडविला गेला होता. त्यात बहुसंख्येने पोलिसांचेच बळी गेले आहेत.नवीन संविधानासाठी घेण्यात येणार्या जनमतापूर्वीच हा स्फोट झाल्याने लोकशाही मार्गावर देश जाऊच नये असाच त्यामागे उद्देश आहे तसेच त्यातून नागरिकांवर दहशत बसवायचा हेतू आहे असे बेबलावी म्हणाले. कैरोतील एका न्यायालयाने यापूर्वीच ब्रदरहूडच्या सर्व कारवायांवर बंदी घालण्याचे आणि संघटनेची सर्व संपत्ती मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.