देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीने यंदाही गतवर्षीइतकीच विक्री करण्याचे उदिष्ट साध्य केले असून त्यासाठी ग्रामीण भागाची मोठी मदत झाली आहे. शहरी भागात मारूती गाड्यांच्या विक्रीत पाच टक्के घट झाली असताना ग्रामीण भागात मात्र विक्री १८ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी कंपनीच्या एकूण विक्रीत ग्रामीण भागाचा हिस्सा ३० टक्क्यांवर गेला असल्याचे आणि आगामी पाच वर्षात तो ५० टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी सांगितले.
भार्गव म्हणाले की गेली तीन वर्षे सतत चांगला होत असलेला मान्सूनचा पाऊस, धान्याचे वाढते दर यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्तीही वाढली आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षात ६० हजार गांवांपर्यंत पोहोचते आहे. मार्च १४ पर्यंत १ लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय कंपनीने ठेवले असून दोन वर्षात अडीच लाख गावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. त्यासाठी गावागावातून रिपेरिंग सेंटर्स, वर्कशॉप, शोरूम्स उघडल्या जात आहेत. सध्या कंपनीचे ग्रामीण भागात ७०० आऊटलेटस असून ६५० मोसाईल वर्कशॉप आहेत. ही वर्कशॉप गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्यांचीही संख्या वाढविली जाणार आहे.