नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली व्यूहरचना तयार केली असून मोदी ङ्गॉर पीएम असा नारा देऊन घरोघर जाऊन प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. १९७५ साली कॉंग्रेसने देशात आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला होता. त्याची आठवण करून देऊन मतदारांना लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्याचे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत काल निश्चित करण्यात आले.
भाजपाची प्रचार मोहीम राबविण्यासाठी देशातल्या ४०० लोकसभा मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. देशाला सुशासन देणे आणि महाशक्ती बनविणे ही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाटचाल करणार असल्याची ग्वाही लोकांना दिली जाणार आहे. मोहीम राबविण्याचा खर्च म्हणून भाजपाच्या सदस्यांकडून अल्प निधी जमा केला जाणार आहे. या निधीची रक्कम किमान दहा रुपये आणि कमाल दहा हजार रुपये असेल.
देशातल्या १० कोटी लोकांना संपर्क साधून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून मोदी पंतप्रधान होण्याचे महत्व आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची गरज पटवून दिली जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माजी मंत्री अनंतकुमार यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांना ही माहिती दिली.