गोव्यात जमले जगभरातील पर्यटक

पणजी- स्वातंत्र्यपूर्व काळात पोर्तुगीज आणि फ्रान्सची सत्ता असलेल्या निसर्गरम्य गोव्यावर आजही पाश्चात्य राहणीमान, खाणेपिणे यांची दाट छाया आहे. तसेच आजही येथे ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने असल्याने इस्टर, नव वर्ष आणि नाताळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे देशविदेशातील पर्यटकांची पाऊले वळू लागली असून गोवा आता या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने जमले आहेत. येथील सुंदर समुद्रकिनारे आणि नाईट लाइफ, जुन्या गोव्यातील आकर्षक बांधणीची घरे, विविध चर्च तसेच संगीत, फेणीचा स्वाद, मासे भात पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. तसेच येथील ४०० वर्ष जुने शांतादुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर हीही पर्यटकांना भावनिक भुरळ घालत असतात. गोव्यातील हॉटेल्स बुकींग फुल झाली असून सर्वच वस्तूंचे दरही वाढले आहेत.नाताळसाठी दुकाने विविध वस्तूंनी सजली आहेत तर बेकर्‍या नाना प्रकारच्या केक कुकीजनी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

गोव्यात वर्षभर पर्यटक येत असतात. त्यामुळे इको टूरिझम, मेडिकल टूरिझम असे विविध पर्याय येथे उपलब्थ आहेतच पण त्याशिवाय आता इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल, गोल्फ कोर्सही पर्यटकांच्या सेवेसाठी तयार केले जात आहेत. येथील वॉटर स्पोर्टस हेही पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे.