आपचा पाठिंबा काढून घेण्याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींवर दबाव

नवी दिल्ली – पहिल्याच प्रयत्नात दिल्ली विधानसभा निवडणुकांत अपूर्व यश मिळविलेल्या आम आदमी पक्षाचा शपथविधी उद्या म्हणजे २६ डिसेंबरला होईल की नाही अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत येऊ पाहणार्‍या या पक्षाला पाठिंबा देऊ नये असा जोरदार प्रयत्न काँग्रेसमधील वरीष्ठ नेते करत आहेत. त्यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली गोळा झालेले वरीष्ठ नेते आहेत आणि पाठिंबा काढून घेण्याबाबत गंभीरपणे विचार केला जात आहे असे सूत्रांकडून समजते.

अर्थात अंतिम निर्णय उपाध्यक्ष राहुल गांधी हे घेणार आहेत.अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार हे ठरल्यापासून काँग्रेसमधील एक गट नाराज झाला असून केजरीवाल यांचे जवळचे सहकारी प्रशांत भूषण यांच्याकडे असलेली काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे हे त्यामागचे कारण असल्याचेही सांगितले जात आहे. शीला दीक्षित यांनी या संदर्भात वरीष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती व त्यात उपराज्यपालांकडे काँग्रेस आम आदमी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे पत्र देण्याचे ठरविले गेले व त्याचा मसुदाही तयार केला गेला आहे असे समजते.

मात्र कांही काँग्रेस आमदारांनी या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा खराब होईल आणि दीर्घकाळ पक्षाला संधीसाधू म्हणून पाहिले जाईल असेही मत मांडले आहे. त्यामुळे पाठिंबा काढण्याऐवजी विनाशर्त पाठिंबा न देता कांही अटींवर द्यावा असाही विचार पुढे आला आहे.

काँग्रेसचे वरीष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनीही दिल्लीच्या जनतेला आम्ही सत्तेत नको आहोत. त्यामुळे आम आदमीला पाठिंबा देण्यापूर्वी पुन्हा विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे तर दुसरीकडे काँग्रेसने आमआदमीचा पाठिंबा काढावा यासाठी दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment