आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारीला

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग आयपीएलसाठी पुढील वर्षी १२ फेब्रुवारीला होणा-या लिलावापूर्वी पाच क्रिकेटपटूंना आपल्या संघातच ठेवण्याची मुभा आयपीएल फ्रँचाइझींना असेल आणि त्यानंतर ‘ राइट टू मॅच ‘ या नव्या नियमानुसार मर्यादित खेळाडूंना लिलावादरम्यान विकत घेता येणार आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आयपीएलमध्ये खेळाडूंचे करार, संघाची रचना व लिलावापूर्वी खेळाडूंना संघात स्थान देण्याच्या सुधारित नियमांचा २०१४ ते २०१६ या तीन वर्षांसाठी उपयोग करण्याचा निर्णय झाला.

आयपीएलच्यास २०१४ ची लिलावप्रक्रिया १२ फेब्रुवारीला होणार असून आवश्यकता भासल्यास १३ फेब्रुवारीलाही ही प्रक्रिया सुरू राहील. या लिलावाचे ठिकाण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.गव्हर्निंग कौन्सिलने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘ खेळाडूंचा लिलाव होण्यापूर्वी २०१३च्या संघात असलेल्या कमाल पाच (त्यात भारतीय असल्यास चारपेक्षा अधिक नाही) खेळाडूंना पुन्हा संघात घेण्याची मुभा फ्रँचाइझींना असेल.

पाच खेळाडूंपैकी १ ते ५ खेळाडूंसाठी अनुक्रमे १२.५ कोटी, ९.५ कोटी, ७.५ कोटी, ५.५ कोटी व ४ कोटी अशी रक्कम द्यावी लागेल. एकूण प्रत्येक फ्रँचाइझीला खेळाडूंच्या मानधनापोटी २०१४ या वर्षाकरिता ६० कोटी द्यावे लागतील. ही रक्कम पुढील दोन वर्षांत प्रत्येकी पाच टक्के वाढणार आहे. त्यात जर एखाद्या फ्रँचाइझीने पाचही खेळाडू पुन्हा घेतले तर त्यासाठी त्याचे ३९ कोटी खर्च होतील आणि उरलेले २१ कोटींची त्याला उरलेल्या खेळाडूंमध्ये विभागणी करावी लागेल. कमीतकमी १६ तर जास्तीत जास्त २७ खेळाडू प्रत्येक संघात असणार आहेत. त्यात ९ खेळाडू हे परदेशी असतील.

Leave a Comment