नवी दिल्ली – दिल्लीच्या सत्ताकारणात इतिहास घडवणारी घटना घडली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या पक्षाने थेट दिल्लीच्या तख्तावर सत्ता काबीज केली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या आज झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन आम आदमी सरकार स्थापन करणार आहे.
त्यानंतर केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. आम आदमी पार्टी दिल्लीत सत्ता स्थापन करणार असल्याचे पत्र आपण राज्यपालांना सोपवले असून ते राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी देणार आहेत. राष्ट्रपतींचा आदेश आल्यानंतर शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित होईल, असे केजरीवाल यांनी सांगितले. मात्र रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान ‘आप’ने दिल्लीत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. तर माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केजरीवालांना सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र आश्वासन पाळणे केवळ अशक्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आपने आपल्याच तत्त्वांशी प्रतारणा केली आहे आणि जनतेसोबत विश्वासघात केला, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हर्षवर्धन यांनी दिली आहे.