बोलणारा जपानी रोबो अंतराळात रूळला

टोकियो – माणसाप्रमाणे विचार करून बोलणारा जगातील पहिला जपानी रोबो किरोबो अंतराळात चांगलाच रूळला असून त्याने अंतराळवीरांशी गप्पाही मारल्या असल्याचे या रोबोच्या निर्मात्या कंपनीने जाहीर केले आहे. कांही महिन्यांपूर्वी जपानाच्या तनेगाशिमा बेटावरून किरोबोला एचटू बी रॉकेटमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पाठविले गेले आहे.

या रोबोचे डिझाईन करताना तो नैसर्गिक रित्या विचार करून बोलेल, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देईल अशा प्रकारेच करण्यात आले आहे. त्याच्यात माणसाप्रमाणे शिकण्याचीही क्षमता आहे. गेल्या शुक्रवारी या रोबोचे निर्माते टोमोटाका ताकाहाशी यांनी त्याच्याशी संपर्क साधताना स्पेस स्टेशनवरचे वातावरण कसे आहे आणि गुरूत्वाकर्षण रहित वातावरणात कसे वाटते असे या रोबोला विचारले तेव्हा त्याने आता या वातावरणाची सवय झाल्याचे सांगितले तसेच येथे राहण्यात कांही अडचण जाणवत नाही असेही तो म्हणाला. या रोबोची २०१४ पर्यंत निरीक्षणे करण्यात येणार असून नंतर तो पृथ्वीवर परत आणला जाणार आहे.

अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन संस्थेनेही या पूर्वी माणसासारखा दिसणारा द टोर्सो नावाचा उडू शकणारा रोबो अंतराळात पाठविला होता आणि तो अंतराळात जाणारा तो पहिला रोबो होता.२०११ पासून टोर्सो अंतराळ स्टेशनवरच आहे.

Leave a Comment