बिग बींनी मानले राज ठाकरेंचे ‘मनसे’ आभार

मुंबई – “मला या कार्यक्रमात बोलावलं, अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. मी मराठी बोलायला शिकतो आहे” काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीयांच्या मुद्यावरुन मनोमन कटूता निर्माण झाल्यानं एकमेकांचे विरोधक बनलेले बिग बी आणि राज ठाकरे यांचे हे विचार.. कुणाचाही विश्वास बसवणार नाही, पण हे घडलं आहे..

मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिग बी यांना बोलावण्यात आलं आणि त्यांनीही मनसेच्या विनंतीला मान देवून कार्यक्रम हजेरी लावली.. बिग बींच्या मनसे व्यासपिठावरच्या या आगमनानं मनसे विरुद्ध बच्चन कुटुंबिय या वादावरही पडदा पडला. अमिताभ यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच मराठीत केली आणि मराठीप्रेमी मनसेशी एकरुप झाल्याचं स्पष्ट केलं. “मनसे चित्रपट सेनेनं अनेक चित्रपट कलाकारांना, पडद्या मागच्या लोकांना सामावून घेतल्याबद्दल चित्रपट सेनेचा आभार मानतो” असंही अमिताभ यांनी सांगितलं. एवढंच नाही तर “भविष्यातही जर चांगल्या कामात मनसेला कधी माझी मदत लागली तर त्यांनी हक्कानं आवाज द्यावा, मी हजर असेल” अशी ग्वाही देखील अमिताभ यांनी दिली.

अमिताभ यांच्या आवाजाची साऱ्या देशाला भूरळ आहे. त्यामुळं उपस्थितांच्या प्रेमाखातर हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता सादर करत अमिताभ यांनी आपल्या छोटेखानी भाषणाचा समारोप केला. सतत उत्तर भारतीयांचा विरोध करणाऱ्या मनसेच्या व्यासपिठावर अमिताभ बच्चन यांची उपस्थिती बरंच काही सांगून जाते. यातून मनसेचा उत्तर भारतीयांप्रती असलेला विरोध मवाळ होत असल्याचं तर स्षट झालंच आहे. पण त्यासोबतच ‘मित्राचा मित्र तो आपला मित्र’ या सुत्राचाही या ‘दिलजमाई’ला आधार आहे. राज ठाकरे यांची नरेंद्र मोदींशी वाढत चाललेली जवळीक सर्वपरिचित आहे. त्यांचा गुजरातचा विकास, मोदींची स्तुती ही सर्वांनीच ऐकली, पाहिलीही आहे. त्याचसोबत अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदी यांचेही घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळंच अमिताभ हे गुजरात टुरिझमच्या जाहिरातींमधेही दिसतात.

Leave a Comment