तुर्तास निवृत्तीचा निर्णय शक्य नाही : हरभजनसिंग

नवी दिल्ली – इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वान याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघातून बाहेर असणार्‍या हरभजन सिंगला त्याच्या या निर्णयाचे फारच कुतूहल वाटते. हरभजनच्या मते, ’भारतीय क्रिकेटर्सना असं एका रात्रीमध्ये निवृत्तीचे निर्णय घेता येत नाही. कारण की, क्रिकेट हा भारतातील प्रचंड लोकप्रिय खेळ असल्याने चाहत्यांचा प्रचंड दबाव आणि अपेक्षा खेळाडूंकडून असतात.’

’भारतात एखाद्या खेळाडूने अशी निवृत्ती जाहीर केल्यास त्याला मीडिया भंडावून सोडेल.’ असेही हरभजन म्हणाला. गेली १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या हरभजन सिंगच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. ’जेव्हा तुम्हांला खरोखरीच वाटू लागेल की, आपण आता थांबायला हवे. तेव्हाच निवृत्ती घेणं योग्य आहे. माझ्या मते, स्वानने आणखी काही वर्ष क्रिकेट खेळण्यास हरकत नव्हती.’ खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर हरभजन नेटमध्ये पुन्हा एकदा कसून सराव करीत आहे. भारतीय संघातून बाहेर असणार्‍या हरभजनला अजूनही भारतीय संघात परतण्याच्या आशा आहेत.

Leave a Comment