केजरीवाल दिल्लीचे सर्वात तरूण मुख्यमंत्री

दिल्ली – दिल्लीची सत्ता सांभाळण्यास सज्ज झालेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीचे आत्तापर्यंतचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या तयारी संदर्भात आज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. केजरीवाल यांनी अगोदरच दिल्ली पोलिसांनी देऊ केलेली झेड सुरक्षा घेण्यास नकार देऊन आपल्या कामाची पद्धत कशी असेल याचे संकेत दिले आहेत.

केजरीवाल यांच्या संदर्भात त्यांचे सहकारी सांगतात ते अतिशय परफेक्शनिस्ट आहेत. आयआयटी मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले केजरीवाल यांनी यूपीएससीची परिक्षा देऊन आयआरएस सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर आयकर विभागात नोकरी केली आहे. तेथेही ते कार्यक्षम, अतिशय प्रामाणिक आणि नेकीचे अधिकारी म्हणूनच ओळखले जात होते. मात्र समाजकार्यात झोकून दिल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आंहे.

केजरीवाल लहानपणी अतिशय धार्मिक होते आणि हनुमान चालीसाचा पाठ करत असत. आता मात्र ते अध्यात्मिक झाले असून तणावाला दूर ठेवण्यासाठी नेमाने विपश्यना करतात. कोणतेही काम अर्धवट सोडणे त्यांना पसंत नाही आणि काम करत असताना बाहेरचे फोन घेणेही ते टाळतात. गेली दोन तीन वर्षे त्यांचे आयुष्य खूपच धावपळीचे झाले आहे मात्र त्यातूनही चित्रपट पाहण्यासाठी ते वेळ काढतात आणि परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमीरखान त्यांचा आवडता हिरो आहे. त्याचा एकही चित्रपट ते सोडत नाहीत. इतकेच काय पण  पत्नी सुनिता आणि अरविद यांची ओळखही चित्रपटाच्या वेडानेच झाली आणि ही ओळख पुढे विवाहात परिणित झाली असेही समजते.

Leave a Comment