आम आदमीची दिल्ली क्रांती

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अखेर दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आणि सरकार स्थापन करण्याचे आव्हान स्वीकारले. दिल्ली असो की अन्य कोणतेही राज्य असो. एखादे सरकार सत्तेवर येणे यात काही नवल नाही. परंतु अरविंद केजरीवाल यांचे सरकार भ्रष्टाचार मुक्तीच्या आणाभाका घेऊन आणि लोकांच्या अपेक्षा बर्‍याच वाढवून सत्तेवर आले असल्यामुळे त्याच्या सत्ताग्रहणाची मोठी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीने भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे हे आश्‍वासन ज्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे ठरवले ते सरकार कमालीच्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर आधारलेले आहे. कॉंग्रेस पक्ष कमालीचा भ्रष्ट असल्याची टीका आम आदमी पाटीने स्वतःच केलेली होती आणि आता त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता भ्रष्टाचाराशी लढता लढता सरकारमध्ये येतो ही गोष्ट अभिनंदनाची आहे. अशा वेळी या सरकारच्या अल्पजीवित्वाविषयी काही भाकित करणे हे अनुचित ठरणार आहे. परंतु या पक्षाचे कट्टर समर्थक ऍड. प्रशांत भूषण यांनीच हे बाळ एक वर्षापेक्षा अधिक दिवस जगणार नाही असे भाकित केले आहे.

कॉंग्रेसने पाठिंबा दिलेल्या कोणत्याही सरकारला एक वर्षापेक्षा अधिक आयुष्य लाभलेले नाही. आय.के.गुजराल, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, एच.डी.देवेगौडा यांना कॉंग्रेसच्या पाठिंब्यानेच पंतप्रधानपदे मिळाली होती. परंतु कॉंग्रेसने त्यातल्या कोणालाही एक वर्षापेक्षा अधिक काळ सत्ता सांभाळू दिली नाही. चंद्रशेखर यांना चार महिने तर चौधरी चरणसिंग यांना २४ तासच पाठिंबा दिला. हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर केजरीवाल यांचाही देवेगौडा कधी होईल याचा नेम सांगता येत नाही. कॉंग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे. हे सरकार स्थापन व्हावे, चालावे असा कॉंग्रेसने अट्टाहास करावा अशी कोणतीच राजकीय स्थिती राहिलेली नाही. कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या सरकारला त्यांची ङ्गजिती करण्यासाठीच खुर्चीवर बसवलेले आहे. त्यांची ती हौस भागली की ते आम आदमी पार्टीची खुर्ची हिसकावून घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. आम आदमी पार्टीला जनतेचा आदेश सत्ता स्थापनेसाठी मिळालेला नाही. त्याला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही आणि निवडणुकीत सर्वाधिक जागासुध्दा मिळालेल्या नाहीत. जागांच्या संदर्भात त्याचा दुसरा क्रमांक आहे आणि कॉंग्रेसच्या बाहेरच्या पाठिंब्यावर या सरकारची सारी मदार अाहे. आम आदमी पार्टीची स्थापना होऊन वर्षही झाले नाही तोच या पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली.

याचे बरेच कौतुकही होत आहे. परंतु पक्ष एक वर्षाचा असला तरी अरविंद केजरीवाल यांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ गेल्या पाच सहा वर्षापासून सुरू होती आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणून हे सरकार सत्तेवर आले आहे. आघाडीच्या राजकारणाचे वैशिष्ट्य असे की दोन पक्षांच्या सहकार्यातून सरकार साकार होत असताना ते दोन पक्ष कोणत्या विचाराचे आहेत याला काही महत्त्व नसते. त्यांची विचारसरणी वेगवेगळी असते म्हणूनच ते दोन वेगळे पक्ष असतात आणि काही किमान समान कार्यक्रम हाती घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलेले असते. आघाडीच्या सरकारची ही ‘अंडरस्टँडिंग’ सर्वांनी गृहित धरलेली असते. तेव्हा आम आदमी पार्टीने सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचा हात हाती घेतला तर त्याला अनैतिक कृत्य म्हणता येणार नाही. तसा आरोप भाजपाने केला आहे. पण या आरोपात काही तथ्य नाही. भारतीय जनता पार्टीनेसुध्दा केंद्रात सरकार तयार करताना निरनिराळ्या एक दोन नव्हे तर २४ पक्षांची मदत घेतली होती हे विसरता येणार नाही. अशीच तडजोड करीत आम आदमी पार्टीने दिल्लीतली सत्ता सांभाळली आहे. आता त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु सरकार स्थापन केले तरीही टीकाच होणार आणि नाही केले तरी टीकाच होणार म्हणून अशा टीकेतले ङ्गोलपट काढून ज्या मुद्यात काही तथ्य आहे त्याचाच विचार केला पाहिजे.

आता आम आदमी पार्टीला मोठ्या कठीण परिस्थितीला तोंड द्यायचे आहे. कारण त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्‍वासने ही बर्‍याचअंशी अवाजवी आहेत. अशी आश्‍वासने जाहीरनाम्यात देणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करणे अवघड असते. याचे प्रत्यंतर आता आम आदमी पार्टीला येईल. किंबहुना वेगळ्या शब्दात असे म्हणता येईल की, आम आदमीने दिलेली आश्‍वासने हेच त्यांच्यासमोरचे आव्हान ठरणार आहे. प्रचाराच्या काळात या पक्षाने कॉंग्रेसला विषारी साप म्हणेपर्यंत मजल गेली होती. किंबहुना आम आदमी पार्टी स्वतः सोडून सगळ्याच पक्षांना भ्रष्ट समजते. असे असले तरी शेवटी सरकार स्थापन करायला त्यातल्याच एखाद्या भ्रष्ट पक्षाशी युती करावी लागते. तेव्हा तशी पाळी येण्याची कधीही शक्यता आहे हे विचारात घेऊन प्रतिस्पर्धी पक्षांवर सभ्य भाषेत आणि संयमी भाषेत टीका केली पाहिजे. आघाड्यांचे सरकार आणि त्यामागची मजबुरी आपण समजून घेऊ शकतो. परंतु तशी आघाडी करायचीच असेल तर कोणावरही तोंड सोडून टीका करता कामा नये. हा धडा केजरीवाल यांना आज तरी सरकार स्थापन करताना मिळाला आहे.

Leave a Comment