आमदार अमित देशमुख यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

नगर – माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी आज राळेगणसिद्धीमध्ये येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांच्याशी आपल्या कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध असून उपोषणानंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आपण आल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी उपोषण हजारे यांनी नुकतेच उपोषण केले. विधेयक मंजूर झाल्यानंतर उपोषण सोडताना हजारे यांनी मंत्री देशमुख यांची आठवण काढली होती. दिल्लीतील उपोषणाच्यावेळी त्यांनीच मध्यस्थी केल्याचे सांगून त्यांच्यासमेवत झालेल्या चर्चेनुसारच हे विधेयक मंजूर झाल्याने आता त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली असेल, असे हजारे म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख आज राळेगणमध्ये आले होते. त्यांनी हजारे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, हजारे यांनी आता लोकपालव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर पत्रकारांशी न बोलण्याची भूमिका घेतली आहे. लोकपालविषयीसुद्धा राष्ट्रपतींची त्यावर सही झाल्यावरच आपण विस्ताराने बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यावरही त्यांनी बोलणे टाळले.

Leave a Comment