राजीनामा दिलाय, हटवले नाही – जयंती नटराजन

नवी दिल्ली – केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी आपल्याला मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेले नसून आपण स्वत:च पक्षकार्यासाठी राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वृत्तपत्रांमध्ये या संबंधात काही बातम्या आल्या आहेत. त्या बातम्यांत तथ्य नसल्याचे जयंती नटराजन यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांना उद्योगपतींनी भाषणासाठी निमंत्रित केले होते, परंतु या उद्योगपतींच्या पर्यावरण खात्याविषयी काही तक्रारी होत्या. आपण या तक्रारींची दखल घेत आहोत असे दर्शविण्यासाठी आणि आपली उद्योगपतींशी होणारी भेट विनाकटकटीची व्हावी म्हणून राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाआधी श्रीमती नटराजन यांना हटवले, असे या वृत्तात म्हटलेले होते.

असे असले तरी आपल्या विरुद्ध कोणत्याही उद्योगपतीची तक्रारच नाही. कोणत्याही औद्योगिक प्रकल्पाचे काम पर्यावरण खात्याच्या विनाहरकत पत्रकाअभावी रखडलेले नाही. या संबंधात आपल्याकडे आलेल्या अर्जांपैकी ९२ टक्के अर्ज निकाली काढलेले आहेत, असाही दावा जयंती नटराजन यांनी केला.

Leave a Comment