फकीर अण्णा बनले सेलेब्रिटी

राळेगण सिद्धी/ पुणे – ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रणेते तसेच जनलोकपाल बिलासाठी देश  ढवळून काढणारे फकीरी वृत्तीचे अण्णा हजारे गेल्या दोन वर्षात सेलिब्रिटी बनले आहेत. गावातील यादवबाबा मंदिरातील एका छोट्याशा खोलीत आयुष्याची ४० वर्षे अत्यंत साधेपणाने राहिलेल्या अण्णांसाठी त्यांनीच स्थापन केलेल्या स्वराज हिंद ट्रस्टने नवे कोरे गेस्ट हाऊस बांधले असून अण्णा सध्या येथेच मुक्कामास आहेत.

बैठकीच्या खोलीत प्रशस्त सोफा, आतील खोलीत टेबल खुर्ची, पलंग, उत्तम पडदे, ए.सी, गेस्ट हाऊसच्या दारात मेटल डिटेक्टर, महाराष्ट्र पोलिसांची चोवीस तास सुरक्षा असा सारा इंतजाम अण्णांसाठी केला गेला आहे. यापूर्वी अण्णांना कोणीही सहज भेटू शकत असे आता मात्र अशी भेट मिळणे मुश्कील झाले आहे. अगदी बहीण आणि आप्त तसेच ट्रस्टींनाही अण्णांच्या भेटीसाठी ताटकळावे लागते आहे असे समजते.

जनलोकपाल बिल याच अधिवेशनात संमत व्हावे यासाठी अण्णांनी आमरण उपोषण सुरू केले होते व नऊ दिवस हे उपोषण चालले.यातून बाहेर आलेले अण्णा अतिशय थकले आहेत. डोळ्यांवर सूज आहे. अण्णा सध्या मौनात आहेत मात्र त्याच्या गेस्टहाऊस बाहेर टिव्ही चॅनल्सच्या ओबी व्हॅन्स आणि अण्णांच्या खोलीच्या बंद दरवाजावर नजर लावून बसलेल्या पत्रकारांचा गराडा पडला आहे. अण्णांचे सचिव दत्ता आवारी चोवीस तास देशभरातून अण्णांना येत असलेले फोन घेत आहेत.

गावकरी सांगतात अण्णांची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा उपोषण केले आहे. मात्र गेल्या दोन वर्षात अण्णांना देशभरातून जो पाठिबा मिळत आहे तो कल्पनेपलिकडचा आहे. अण्णांची ही लोकप्रियता गावासाठी नवीन आहे. आता अण्णांना भेटायला शिफारस घेऊन लोकांना यावे लागते. गेली वीस वर्षे अण्णा उपोषणे करताहेत मात्र हा बदल गेल्या दोन वर्षातला आहे. अण्णांचे देशव्यापी दौरे, विमान प्रवास, मुलाखती, टिव्ही शो यात प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे.

राळेगणचे सरपंच जयसिंह मापारी मात्र या सार्‍या प्रकारामुळे अतिशय खूष आहेत. ते सांगतात गेली ४० वर्षे अण्णा येथे राहात आहेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गावाची चर्चा देशभर सुरू आहे.येथील वर्दळ वाढली आहे आणि अण्णांमुळे गावाला देशाच्या नकाशावर ठळक स्थान मिळाले आहे.

Leave a Comment