मुंबई – भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मुंबईत घेतलेल्या महागर्जना रॅलीत व्होट फॉर इंडियाचा नारा देत काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. मोदींनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर बोलताना, देशाच्या सर्व समस्यांचे कारण येथील जनता, भूगोल, इतिहास किंवा निसर्ग नसून काँग्रेसशासित सरकार आहे आणि या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार करावे लागेल, असे म्हणाले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी नाही तर देशासाठी मत द्या, असं आवाहन करत मोदींनी व्होट फॉर इंडियाचा नवीन नारा दिला आहे.
नरेंद्र मोदींच्या या महागर्जना रॅलीला प्रचंड गर्दी झाली होती. भाजपच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणानंतर नरेंद्र मोदींचं भाषण झालं. मुंबईतूनच सुरू झालेल्या चले जाव चळवळीची आठवण करून देत, या देशाला काँग्रेसमुक्त करा, असा नारा मोदींनी दिला.
विकासाची धोरणं, रोजगार, महागाई, शिक्षण, वीजपुरवठा या सगळ्या मुद्द्यांबरोबरच मोदी तरुणांच्या कल्याणावर बोलले. मी पक्षासाठी मत मागत नाही, असे सांगत देशासाठी मत द्या, असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आणि व्होट फॉर इंडियाचा नारा दिला. मुंबईकरांशी मराठीतून संवाद साधत गुजरातसाठी मुंबई हे दुसरं घर आहे, असे भावनिक आवाहनही नरेंद्र मोदींनी केले. मोदींच्या भाषणाआधी महाराष्ट्र भाजपने नरेंद्र मोदींना 25 कोटी रुपयांचा चेक दिला.
भाषावार प्रांतरचनेच्या नावाखाली काँग्रेसने राज्यांची विभाजने करून भावांमध्ये भांडणे लावली. फोडा आणि राज्य करा हीच काँग्रेसची नीती आहे. मध्य प्रदेश हे पूर्वी बिमारू (मागास) राज्य होते. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा विकास झाला. महाराष्ट्रातील सिंचनाचे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराने कलंकित होऊन खड्ड्यात गेले आहेत. याचे कारण काय आहे? महाराष्ट्रात हजारो शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ का आली? असे अनेक सवाल उपस्थित केले़