इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान निवृत्त

लंडन – आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधून इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने निवृत्ती जाहीर केली आहे. अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना स्वानचा अचानक निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय इंग्लंडसाठी एक धक्का समजला जात आहे. सध्या सुरु असलेल्या अॅशस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. स्वानने तात्काळ निवृत्त जाहीर केल्याने तो चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून खेळताना दिसणार नाही.

याबाबत बोलताना ग्रॅमी स्वान म्हणाला, मी भरपूर विचार करुन निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात वर्षांपासून इंग्लंड संघ माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे होता. हा अत्यंत कठिण निर्णय होता. पण पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे असे स्वानने म्हटले आहे.

अॅशस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियन संघ ३-० ने आघाडीवर आहे. स्वानने या मालिकेत तीन कसोटीत ८० च्या सरासरीने फक्त सात बळी घेतले. त्याच्यावर कामगिरी उंचावण्याचा दबाव होता.इंग्लंडकडून खेळताना स्वानने ६० कसोटी सामन्यात २९.९६ च्या सरासरीने २५५ बळी घेतले. २००८ साली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण केले. इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा तो सहावा गोलंदाज आहे.