नवी दिल्ली – राजकीय कार्य किंवा पार्श्वभूमी नसलेला पंतप्रधान पुन्हा या देशाला परवडणार नाही आणि देशाचा कारभार एखाद्या कंपनीप्रमाणे चालविलेला देशाला ङ्गार महाग पडेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतले नेते अरुण जेटली यांनी दिला आहे. जगातली ही सर्वात मोठी लोकशाही एका नोकरशहाकडून चालविला जाण्याचा प्रयोग या देशाला परवडणारा नाही, असेही जेटली यांनी ङ्गिक्की या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर बोलताना प्रतिपादन केले.
अराजकीय पंतप्रधान परवडणार नाही
एखादा पंतप्रधान यशस्वी की अयशस्वी याचा निर्णय तो किती वर्षे सत्तेत राहिला यावरून करता कामा नये तर त्यांनी कोणते लोकाभिमुख निर्णय घेतले, विशेषत: अर्थव्यवस्थेशी निगडित अशी कोणती भूमिका राबवली यावरून त्याचे यशापयश ठरवले पाहिजे; पंतप्रधानपद ही काही नोकरी नाही तो भारतीय शासन यंत्रणेतला शेवटचा शब्द असतो, कारण तो या लोकशाहीतला कार्यकारी प्रमुख असतो असेही जेटली म्हणाले.
देशाचा पंतप्रधान कधीही असहाय असता कामा नये आणि आपल्याला काम करायची संधीच मिळालेली नाही असा बहाणा सांगण्याची पाळी त्याच्यावर येता कामा नये, तो त्याच्या पक्षाचा, सरकारचा आणि अंतिमत: देशाचा सर्वोच्च नेता असतो. त्याचे ते नेतृत्व हे निसर्गत: प्रस्थापित झालेले असले पाहिजे असेही प्रतिपादन अरुण जेटली यांनी केले.
केंद्रातल्या सध्याच्या सरकारच्या स्थितीचे वर्णन करताना अरुण जेटली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा शब्द शेवटचा नाही आणि सरकारच्या बाहेरच्या अनेक यंत्रणांचे त्यांच्यावर अंकुश आहेत. या यंत्रणा देशाच्या अर्थव्यवस्थेला विभिन्न दिशांना खेचणार्या आहेत. त्यामुळे मनमोहनसिंग यशस्वी ठरले नाहीत, असे जेटली म्हणाले.