लालू प्रसाद आणि शरद यादव एम्स मध्ये दाखल

नवी दिल्ली- राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एम्समध्ये दाखल केले गेले आहे. त्याचबरोबर जदयूचे नेते शरद यादव यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने याच रूग्णालयात दाखल केले गेले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चारा घोटाळा प्रकरणात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या लालूंना नुकताच जामीन मंजूर झाला असून ते कालच दिल्लीत पोहोचले.त्यापूर्वी अडीच महिने त्याना तुरूंगात काढावे लागले होते. पत्रकारांशी बोलत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्वरीत एम्समध्ये नेण्यात आले. तेथे तपासणीत त्यांचा रक्तदाब वाढला असल्याचे आढळले असे त्यांच्या सहाय्यकांनी सांगितले.

जदयूचे महासचिव जावेद रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद यादव यांना सकाळी ११ च्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाही याच रूग्णालयात दाखल केले गेले. गेले दोन दिवस यादव यांना मधुमेहाचा त्रास होत असून त्यांच्या रक्तशर्करेची पातळी सतत खालीवर होत आहे. कालही रक्तातील साखर वाढल्याने त्यांना अस्वस्थ होत होते. उपचारानंतर त्यांची तब्येत ठीक असल्याचेही सांगण्यात आले आहे.