मनिला विमानतळावर महापौरासह चौघांची हत्या

मनिला- येथील मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दक्षिण फिलिपिन्समधील लबॅन्गन महापौर व त्यांच्या पत्नीसह चारजणांची हत्या करण्यात आली. ‘महापौर, त्यांचे कुटुंबीय आणि काही सुरक्षारक्षकांवर हल्ला झाला.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दक्षिण फिलिपिन्समधील अशांत मिंडानाओ प्रांतातील लबॅन्गन शहराचे महापौर व त्यांच्या पत्नीचा समावेश आहे,’ असे मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सरव्यवस्थापक एंजिल होनरॅडो यांनी सांगितले. उकोल टॅलुम्पा हे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असून, त्यांनी मागील मे महिन्यात लबॅन्गन महानगरपालिकेची अत्यंत चुरशीची निवडणूक जिंकली होती. ते एका विमानातून बाहेर पडून चाललेले असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षारक्षकांना गोळ्या घालून मारण्यात आले.