आमिरच्या अभिनयावर तरलेली सर्कस

यशराज फिल्म्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ’धूम 3’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्कंठता शिगेला पोहोचली होती. आयमॅक्स फॉरमॅटमध्ये रिलीज होणारा हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. ’धूम’ सिरिजमधील हा तिसरा पार्ट आहे. धूमच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसर्‍या भागात ह्रतिक रोशन तर आता तिसर्‍या भागात अमिर खान पहिल्यांदाच निगेटीव्ह भुमीकेत आहे. यामुळे चित्रपटा विषयी सर्वांनाच उत्सुकता होती मात्र ‘धूम 3’ ने अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

धूम-3ची कथा जादूगार इक्बाल (जॅकी श्रॉफ) याच्या शिकागोमधील द ग्रेट इंडियन सर्कसवर आधारित आहे. त्यानेच चित्रपटाची सुरूवात होती.मात्र, ही सर्कस फ्लॉप होती. बँकेचे कर्ज फेडायचे या विवंचनेत इक्बाल खचून जातो. सर्कस वाचविण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, यात यश येत नाही. बँक कर्जामुळे बाका प्रसंग आल्यामुळे शेवटी इक्बाल आत्महत्या करतो. इक्बालचा मुलगा साहिर म्हणजेच अमिर खान याचा सूड घेण्यासाठी पेटून उठतो. पुन्हा सर्कस सुरू करण्यासाठी वाटेल ते करण्याची साहिरची तयारी असते. त्यासाठी तो पर्याय निवडतो तो म्हणजे बँक लुटण्याची. बँकेच्या प्रत्येक शाखेत चोरी करण्यास सुरूवात करतो. मात्र, साहिर म्हणजे अमिर खानला कोणीही पकडू शकत नाही. यापाठीमागे मोठी स्टोरी आहे. हे राज या सिनेमातून दाखविण्यात आले आहे. बाईकस्वार धूम स्टाईलने जाणारा अमिर पडद्यावर पाहणे चांगले ठरेल आणि पडद्यावर नेमकी काय स्टोरी आहे, ते पाहिल्यावर समजेल.

दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यने आमिर – कॅटरिना ही हटके जोडी आणि आमिरला खलनायकाच्या भुमीकेत आपल्या समोर आणले असले तरी त्याने कथेवर फारसे काम केले नाही. कथानकात सस्पेन्स आहे, मात्र फक्त आमिर भोवतीच कथा फिरते यामुळे इतरांना वाव मिळालेला नाही. अ‍ॅक्शनचा भडीमार असलेली पटकथा सामान्य प्रेक्षकांआ खिळवुन ठेवणारी असली तरी चित्रपटाकडुन असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.

आमिरचे नाव घेतल्यावर काही बोलण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. मि. परफेक्शनिस्ट आमिर त्याच्या भूमिका फार बारकाईने निवडतो. पहिल्यांदाच आपण त्याला खलनायकाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत. त्याने चित्रपटात केलेली धाडसी अ‍ॅक्रोबॅटिक दृश्ये आणि त्याची पिळदार शरीरयष्टी तुमच्या डोळ्यात भरणारी ठरणार आहे. अभियनाचा विचाल केला तर अमिर खानने सर्वांवर मात केली आहे. अभिषेक बच्चनला जास्त काही अभियनात दाखविता आले नाही. अभिषेक-उदय या जोडीविना धूम ची सिरीज पूर्ण होणे शक्य झाले नसते, यामुळेच ते चित्रपटटालचा भाग आहेत. हे दोघेही आधीच्याच म्हणजेच जय आणि अलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.मात्र, इक्बालची जी भूमिका जॅकी श्रॉफने बजावली त्याला तोड नाही. चित्रपटाच्या प्रोमोमधून कॅटरिनानेही सर्वांचेच लक्ष वेधले होते. चित्रपटात आमिरसोबत कॅटरिनाासुद्धा काही साहसी दृश्ये करताना दिसते मात्र तिच्या वाटट्याला अभिनयाच्या नावाखाली केवळ तीन गाण्यांवररील डान्स आलेला आहे.

धूम हा चित्रपट पूर्णपणे साहसी दृश्ये आणि अतिवेगाने जाणा-या बाइक दृश्यांनी भरलेला आहे. शिकागोच्या रस्त्यांवर आपल्या बॉलीवूड कलाकारांनी केलेली ही जीवघेणी दृश्ये पाहणे तुम्हाला नक्कीच आवडेल. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच गाण्यांनी चाहत्यांमध्ये चांगलीच धूम माजवली होती. आमिरचे ’टॅप’नृत्य, कॅटरिनाचा ’कमली’ अंदाज आणि बॉलीवूडमधले आतापर्यंतचे सर्वाधिक महागडे असलेले ’मलंग’ गाणे हे आकर्षण आहे. एकंदरीत धुम सिरिज मधील हा चित्रपट आमिर खान भोवतीच फिरवण्यात आलेला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही मेजवाणी असली तरी एकुण चित्रपट फारसा प्रभावी झालेला नाही.

चित्रपट – धूम 3,
निर्मिती – यशराज फिल्मस्,
दिग्दर्शक – विजय कृष्ण आचार्य,
संगीत – प्रीतम
कलाकार – आमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा.

रेटिंग – * *

Leave a Comment