हुंड्यापोटी मागितले फेसबुकचे १० लाख लाइक्स

येमेन – हुंड्यात सोने चांदी अथवा महागड्या वस्तू किंवा रोकड मागितल्याचे आपण नेहमीच एकतो. मात्र येमेन मध्ये वधूपित्याने हुंडा म्हणून फेसबुकचे १० लाख लाईक्स जावयाकडे मागितले असल्याची घटना घडली आहे. या देशात मुलाकडच्यांना वधुला हुंडा द्यावा लागतो. अर्थात ही मागणी पुरी करण्यासाठी कोणतीही मुदत मात्र सासरेबुवांनी घातलेली नाही. मात्र वराला ही मागणी पुरी करणे चांगलेच जड जाणार आहे. कारण येमेनची लोकसंख्याच मुळी २ कोटी ४० लाख आहे आणि त्यातील बहुसंख्य जनतेला इंटरनेट म्हणजे काय याची पुसटशीही कल्पना नाही.

ही मागणी करणारे सालेम आएश हे कवी आहेत. आपल्याला इंटरनेटवर प्रसिद्धी मिळावी अशीही त्यांची सुप्त इच्छा आहे व त्यापोटीच ही अनोखी मागणी त्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. या हुंड्याची खबर सोशल मिडीयात वार्‍याच्या वेगाने पसरली असून सालेम यांना ३५ हजार लाइक्स मिळालेही आहेत. अर्थात त्यात कांही जणांनी त्यांच्या या लोभीपणावर टीका करून असली सवंग लोकप्रियता काय कामाची असा सवालही केला आहे म्हणे !

सालेम यांच्या जावयाचे नांव आहे ओसामा. ओसामाला सालेम यांची मुलगी फारच आवडली आहे. सालेम यांच्या मते २०११ मध्ये अब्दुल्ला सालेह यांची राजवट येमेनमध्ये आल्यापासून त्याच्याविरोधात सतत निदर्शने होत आहेत. देश वाईट परिस्थितीतून जात आहे. लोकांकडचा पैसा संपत चालला आहे.मग अशावेळी लग्नात हुंडा देणार कसा? लग्नात सोने चांदी मागणे तर शक्य नाही म्हणून त्यांनी ही साधी मागणी केली आहे. अर्थात ओसामा साठी ही अग्निपरिक्षा आहे. मात्र तो खरोखरच हुंडा पूर्तीसाठी मेहनत करतोय असे दिसले तर सालेम त्याला हुंड्यातून थोडी सूट देण्यास तयार आहे असेही समजते.