सौरव गांगुलीच्या क्रिकेट प्रशिक्षण संस्थेवर वर्षासाठी बंदी

कोलकाता – अंडर १४ अथवा अंडर १७ अशा वयोगटासाठी घेतल्या जात असलेल्या क्रिकेट स्पर्धात खेळाडूंची खोटी वये दिल्याप्रकरणात कोलकाता क्रिकेट असोसिएशनने १३ क्रिकेट कोचिंग सेंटर्सवर १ वर्षासाठी बंदी घातली आहे. यात भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली व बंगालचा कप्तान संभारण बॅनर्जी यांच्या कोचिंग सेंटर्सचाही समावेश असल्याचे समजते. या संदर्भात खोटी वये दिल्याप्रकरणी ४२ खेळाडूंवरही दोन वर्षासाठी बंदी घातली गेली आहे. कोलकाता क्रिकेट असोसिएशने पुढे असे प्रकार आढळल्यास खेळाडूंवर आजीवन बंदी घातली जाईल असा इशाराही दिला आहे.

अंबर राय अंडर १४ व अंडर १७ स्पर्धांमध्ये खेळाडूंची खोटी वये देण्याचे प्रकार घडले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या या स्पर्धांतील दोषी खेळाडूंना आज शिक्षा सुनावली गेली आहे. सौरव गांगुली याच्या सॉल्ट लेक भागात असलेल्या कोचिंग सेंटरचे अधिकारी म्हणाले की आम्ही प्रशिक्षणासाठी खेळाडू घेताना त्यांचे जन्मदाखले पाहिले नाहीत. कारण क्रिकेट बोर्डाने ते आधीच तपासले असतील असे आम्हाला वाटले होते. मात्र यापुढे ती दक्षता घेतली जाईल आणि खेळाडूंने सादर केलेला जन्मदाखला महापालिकेतील नोंदींनुसार तपासून मगच खेळाडूंना दाखल करून घेतले जाईल.

Leave a Comment