पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जयललिता

चेन्नई- पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी आणि राहूल गांधी यांच्या नावांची चर्चा होत असतानाच अण्णा द्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या शर्यतीत उडी घेतली असून या पदाच्या प्राप्तीसाठी पदर खोचला आहे. त्यांच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीने आपल्या बैठकीत जयललिता या पंतप्रधान होऊ शकतात असा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

जयललिता या मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रशासन कौशल्याचे दशर्र्न नेहमीच घडवले आहे, त्यांनी देशातल्या सर्व जाती धर्माच्या आणि भाषांच्या जनतेला कधी दुजाभावाची वागणूक दिलेली नाही. त्यामुळे त्या या पदासाठीच्या उमेदवार होऊ शकतात असेही या ठरावात म्हटले आहे.

आजवर उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि पंजाबच्या नेत्यांना पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आाहे. तेव्हा आता तामिळनाडूला हा मान मिळण्याची वेळ आली आहे असेही या ठरावात म्हटले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकने कोणाशी युती करावी याचा निर्णय जयललिता यांंनीच घ्यावा असाही ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आलाा आहे.

Leave a Comment