टीम इंडिया पाठोपाठ आफ्रिकेचीही घसरण

जोहान्सबर्ग : जोहान्सबर्गच्या वॉंडरर्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी टीम इंडियाचा डाव तासाभरातच आटोपला. ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि झहीर खान या टीम इंडियाच्याा वेगवान त्रिकुटाच्या भेदक मा-यासमोर यजमान दक्षिण आफ्रिकेचीही घसरगुंडी उडाली. त्यामुळे टीम इंडियाच्याै पहिल्या डावातील २८० धावसंख्येला उत्तर देताना दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २१३ अशी मजल मारली.

दक्षिण आफ्रिकेच्या व्हरनॉन फिलॅंडरने नाबाद ४८ धावा केल्या नसत्या तर यजमानांची अवस्था अधिकच केविलवाणी झाली असती. तत्पूर्वी, कालच्या ५ बाद २५५ धावसंख्येत केवळ २५ धावांची भर घालून टीम इंडियाचे उर्वरित फलंदाजही तंबूत परतले. एक वेळ १ बाद १३० अशा मजबूत स्थितीत असलेल्या आणि भारताच्या हातातून कसोटी हिसकावून घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या दक्षिण आफ्रिकेची अवस्था ईशांत शर्मा, मोहम्मद शमी व झहीर खान यांनी ६ बाद १४६ अशी केली. यजमानांची मधली अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. हाशिम अमला, कर्णधार ग्रमी स्मिथ, जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्स या खंद्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडले फाफ ड्यू प्लेसीने व्हरनॉन फिलॅंडरच्या साथीत डाव सावरला.

टीम इंडियात पुनरागमन करणा-या झहीर खानने आपला फॉर्म राखत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची पुन्हा एकदा शिकार केली. त्याआधी सकाळी टीम इंडियाचा पहिला डाव २८० धावांवर आटोपला. भारताने ५ बाद २५५ वरून सकाळी खेळण्यास सुरूवात केली. मात्र धोनी व अजिंक्य रहाणे लवकरच माघारी परतले. अवघ्या २५ धावांतच भारताचे पाच फलंदाज बाद झाले. झहीर खान, ईशांत शर्मा व मोहम्मद शमी या तळाच्या त्रिकुटाला तर भोपळाही फोडता आला नाही.

Leave a Comment