मागे एकदा जगातल्या लोकांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. ‘उर्वरित जगातल्या धान्याच्या दुर्भिक्ष्याविषयी तुमचे मत काय ?’ रशिया आणि चीनमधील लोकांनी सांगितले, मत म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नाही. आफ्रिकेतल्या लोकांनी सांगितले, धान्य म्हणजे काय माहीत नाही. कॅनडातल्या लोकांनी सांगितले दुर्भिक्ष्य म्हणजे काय हे माहीत नाही आणि अमेरिकेतले लोक म्हणाले, उर्वरित जग म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही. अमेरिकेतल्या लोकांनी जगातल्या अन्य देशांतल्या लोकांची काही पर्वा नाही. त्यांच्यासाठी अमेरिका हेच जग आहे. अमेरिकेत राहतात तीच माणसे आहेत. इतर देशात राहून आपण माणूस आहोत असे म्हणणारे लोक म्हणजे माणसे नव्हेत. ती तर जनावरे आहेत. त्यांना मारले आणि त्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेऊन आपण चैन केली तर त्यात काही चूक नाही. अमेरिकेतल्या भारतीय अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना गुन्हेगारा प्रमाणे वागवताना अमेरिकेची हीच हिणकस भावना प्रकट झाली आहे. पण त्यावरून आपला देश कधी नव्हे ते पेटून उठला आहे. नाही तर कोणाही सामान्य देशाने भारताची खोडी काढावी आणि भारत सरकारने ती सहन करावी असा प्रकार नेहमीच घडतो.
आपल्या शेजारचे श्रीलंंका, बांगला देश, पाकिस्तान असे लहान लहान देशसुध्दा भारताला भीक घालत नाहीत आणि भारताच्या अगदी सन्मानाच्या चिन्हाचासुध्दा आदर करत नाहीत. देशाचे परराष्ट्र धोरण कणखर नसल्याचा हा परिणाम आहे. आपण अपमान सहन करतो. फारच हद्द झाली तर, आमची शांतता म्हणजे दुबळेपणा समजू नका असा इशारा देतो पण या पलीकडे काहीच करत नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकेत घडलेल्या एका घटनेत मात्र आपला सारा देश एकमुखाने अमेरिकेचा निषेध करायला उभा राहिला. आपल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येेथे असलेल्या व्यापारी कचेरीतल्या उपउच्चायुक्त म्हणून काम करणार्या देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेच्या सरकारने अतीशय वाईट वागणूक दिली. या वकिलातीत उच्चायुक्त हा सर्वात श्रेष्ठ अधिकारी असतो. त्या पदाच्या खालोखाल असलेल्या पदावर काम करणार्या देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेने भारताच्या सन्मानाचा कचरा करीत गुन्हेगारागत वागणूक दिली. या प्रकाराने भारतातल्या जनतेचे मन दुखावले गेले. वागणूक मिळालेल्या भारतीय अधिकारी या महिला असल्यामुळे तर लोकांच्या भावना फारच दुखावल्या आणि त्याची प्रतिक्रिया उमटली.
अशी एखादी प्रतिक्रिया उमटताना तिला एक विशिष्ट पार्श्वभूमी असते. बर्याच दिवसांपासून साचलेल्या रागाचाही तो स्फोट असतो. तसा संताप भारतात साचला होता. गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या विमानतळावरील अधिकार्यांनी काही मान्यवर भारतीयांना तपासणीच्या निमित्ताने त्रास दिलेला आहे. शाहरूखखान, आझम खान माजी, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेली वागणूक वाईट होती. त्यानंतर भारताचे व्यापार मंत्री आनंद शर्मा यांचीही सामान्य माणसाप्रमाणे तपासणी करण्यात आली. या सगळ्या वागणुकीमागे अमेरिकी लोकांचा वर्णभेद आणि वांशिक श्रेष्ठत्वाचा अहंगंड आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये अमेरिकेच्या या वागणुकीची प्रचंड चीड साचलेली होती. देवयानी खोब्रागडे यांना मिळालेल्या हिणकस वागणुकीमुळे या चिडीला व्यापक रूप प्राप्त झाले आणि भारतात सर्व स्तरावर अमेरिकेचा निषेध करण्यात आला. अमेरिकेतून भारतात येऊन राहिलेल्या उच्चायुक्त कार्यालयातल्या अमेरिकी कर्मचार्यांना भारतात अनेक सवलती आणि राजनैतिक दर्जा मिळतो. कायद्याने त्यांची तशी पात्रता नसताना आणि भारतावर तसे बंधनकारक नसताना त्यांना आपण परिचय पत्रे देतो आणि त्यामुळे त्यांना काही विशेषाधिकार मिळतात. सामान्य कायद्यातून सूटसुध्दा मिळते. त्यांची पात्रता नसताना या सवलती मिळतात. पण अमेरिकेतील भारतीय अधिकार्यांना तशी पात्रता असताना आणि कायद्याने बंधनकारक असतानाही अशा सवलती मिळत नाहीत.
भारतीय लोकांच्या मनामध्ये अमेरिकन लोकांविषयी उगाच एक आदर आणि वचक असतो आणि त्यापोटी आपण त्यांच्याशी चांगले वागतो परंतु ते मात्र आपल्याला किंमत देत नाहीत. देवयानी खोब्रागडे यांना रस्त्यावर अटक करणे, हातकड्या घालणे, कपडे काढून तपासणी करणे आणि गांजेकस आरोपींच्या सोबत तुरूंगात ठेवणे या गोष्टीतून भारताकडे बघण्याची त्यांची हिणकस दृष्टीच व्यक्त होते. त्यांच्यामते देवयानी खोब्रागडे यांनी दोन अपराध केले आहेत. एक म्हणजे मोलकरणीचा व्हिसा मिळविण्यासाठी चुकीची माहिती देणे आणि तिला कमी पगार देणे. हे त्यांचे आरोप आहेत. त्या आरोपाच्या अनुरोधाने चौकशी आणि तपास करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे असे मानले तरी त्यासाठी कपडे काढून तपासणी कशाला करावी लागते आणि हातकड्या घालून जेलमध्ये कशाला ठेवावे लागते ? हा काही चोरी, दरोेडेखोरी, तस्करी असा गुन्हा नाही. परंतु अमेरिकेचा सार्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यातून व्यक्त होतो. भारताने त्यांना दिलेले उत्तर योग्यच आहे. आपल्या स्वाभीमानाला कोणीच डंख मारता कामा नये.