ठाणे महापालिकेत शिवसेनेला खिंडार

ठाणे- ठाणे परिवहन सेवेत शिवसेना भाजप युतीला खिंडार पडले आहे. ही बाब बुधवारी परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना निदर्शनास आली. शिवसेनेचे परिवहन सदस्य शैलेश भगत यांनी राष्ट्रवादीकडून या निवडणुकीसाठी अर्ज भरल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये पालिका मुख्यालयासमोर हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी येऊन मुख्यालयाला सुरक्षाकडे दिले.

२३ डिसेंबर रोजी ठाणे परिवहन समिती सभापतीपदाची निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्याचा दिवस होता. त्यानुसार दुपारी दोन वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर शिवसेनेचे परिवहन सदस्य शैलेश भगत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सभापतीपदासाठी अर्ज भरायला आले. त्यावेळी मुख्यालयात उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.

हा गोंधळ तब्बल अर्धातास पालिका मुख्यालय परिसरात सुरु होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर नौपाडा पोलिस घटनास्थळी आले आणि राज्य राखीव पोलिसही पालिका मुख्यालयात पोहचले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात भगत यांना प्रथम नौपाडा पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यालयात आणल्यानंतर त्यांनी महानगरपालिका विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व आरपीआय लोकशाही आघाडीचे गटनेते संजय भोईर, काँग्रेस गटनेते रविंद्र फाटक यांच्या उपस्थित परिवहन सभापतीपदासाठी अर्ज भरला.

ठाणे परिवहन सेवेत पुर्वी शिवसेना- भाजपा युतीचे पाच सदस्य होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य होते. मात्र आता भगत यांनी राष्ट्रवादीतून अर्ज भरल्याने युतीची एक जागा कमी झाली आहे. शिवसेनेकडून सभापतीपदासाठी प्रकाश कदम यांनी अर्ज दाखल केला आहे.

Leave a Comment