कोहलीच्या शतकाने टीम इंडियाचा डाव सावरला

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या शानदार शतकाने टीम इंडियाला वाचविले आहे. मालिकेतील पहिल्या जोहान्सबर्ग कसोटीत पहिल्या दिवसअखेरीस टीम इंडियाने ५ बाद २५५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला तेव्हा अजिंक्य रहाणे ४३, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावांवर खेळत होते. त्यांाच्यांकडून मोठी धावसंख्ये‍ची अपेक्षा आहे.

टीम इंडियाचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. वाँडरर्सवर डेल स्टेन, व्हेरनॉन फिलँडर आणि मॉर्ने मॉर्केलचा भेदक माऱ्याचा सामना करणे आव्हानात्मक होते. सलामीवीर शिखर धवनने दोन चौकार ठोकून आक्रमक सुरुवात केली. तर त्याचा जोडीदार मुरली विजयची सुरुवात धडपडतच झाली.

डेल स्टेनने धवनला (२७ चेंडूंत १३ धावा) इम्रान ताहीरकडून झेलबाद केले, तर मुरली विजयला (४२ चेंडूंत ६ धावा) मॉर्केलने माघारी पाठवले. यावेळी टीम इंडियाचा स्थिती २ बाद २४ अशी झाली होती. यानंतर आलेल्या विराट कोहलीने आक्रमक पवित्रा घेतला, तर पुजाराने त्याला साथ देत संयमी फलंदाजी केली. या जोडीने तिस-या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली. धाव घेण्याच्या गडबडीत पुजारा (९८ चेंडूंत २५ धावा) धावचीत झाला आणि ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर आलेल्या रोहित शर्माला (४२ चेंडूंत १४ धावा) छाप पाडता आली नाही. पहिल्या दिवशी फिलँडरची विकेटची पाटी कोरी राहणार नाही, याची काळजी रोहितने घेतली. यानंतर कोहलीने मुंबईकर अजिंक्य रहाणेला साथीला घेतले. या जोडीने भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या विराट कोहलीने १४० चेंडूंत १६ चौकारांसह आपले शतक पूर्ण केले. कोहलीचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलाच सामना खेळत असलेल्या २५ वर्षीय कोहली दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेधडक खेळत होता. त्यामुळे रहाणेलाही स्फूर्ती मिळत होती. अखेर जॅक कॅलिसला ही जोडी फोडण्यात यश आले. कोहली-रहाणेने पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. कोहलीने १८१ चेंडूंत १८ चौकारांसह ११९ धावा केल्या. ही त्याची कसोटीतील सर्वोच्च खेळी ठरली. स्कोअरबोर्ड भारत: मुरली विजय- झे. डिव्हिलियर्स गो. मॉर्केल ६, शिखर धवन- झे. ताहीर गो. स्टेन १३, चेतेश्वर पुजारा- धावचीत २५, विराट कोहली- झे. ड्युमिनी गो. कॅलिस ११९, रोहित शर्मा- झे. डिव्हिलियर्स गो. फिलँडर १४, अजिंक्य रहाणे- खेळत आहे ४३, महेंद्रसिंग धोनी- खेळत आहे १७, अवांतर- १८ एकूण- ९० षटकांत ५ बाद २५५.

Leave a Comment