आम आदमी पार्टीत सरकारवरून मतभेद

नवी दिल्ली – कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन करण्याच्या कल्पनेला आपला तीव्र विरोध आहे, परंतु आपल्या पक्षातल्या काही आमदारांना सरकार स्थापन करावेसे वाटते आणि त्यावरून पक्षात मतभेद आहेत अशी कबुली आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, केवळ कॉंग्रेसच नाही तर भाजपाशी सुद्धा कसलीही तडजोड करू नये, असे आपले मत आहे असे सांगितले. कॉंग्रेसने त्यांच्या पक्षाला विनाअट पाठींबा देण्याची घोषणा केली आहे आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेतल्यास ७० विधानसभा सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीचे संख्याबळ ३६ होऊन बहुमत सिद्ध होऊ शकते.

सरकार स्थापन करण्याच्या बाबतीत पक्षात मतभेद निर्माण झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी याबाबत जनतेचे मत आजमावण्याचा उपक्रम केला आणि मतदारांनी मोठ्या संख्येने सरकार स्थापनेच्या बाजूने कौल दिला. याबाबत विचारले असता अरविंद केजरीवाल यांनी या उपक्रमाचे समर्थन केले. आपल्या लोकशाहीमध्ये सरकार स्थापने बाबत जनतेचे मत घेण्याची अशी पद्धत आजवर नव्हती, म्हणून लोकांना ही पद्धत नवी वाटत आहे. परंतु तिच्यात गैर काही नाही असे ते म्हणाले.