ब्रासिला – अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून अन्य देशांवर व देशांच्या प्रमुखांवर ठेवली जात असलेली गुप्त पाळत उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा एडवर्ड स्नोडेन ब्राझीलच्या आश्रयास येऊ पाहात असला तरी ब्राझील सरकारचा त्याला आश्रय देण्याचा विचार नाही असे ब्राझील सरकारने स्पष्ट केले आहे.
स्नोडेन सध्या रशियात असून तेथे त्याला ताप्तुरता राजकीय आश्रय दिला गेला आहे. त्याची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे अन्य देशांकडे आश्रय मिळावा यासाठी स्नोडेन प्रयत्नशील आहे. रशियात आश्रय मिळण्यापूर्वी ज्या देशांकडे त्याने आश्रय मिळण्यासाठी विनंती केली होती त्यात ब्राझीलचा समावेश होता. आता स्नोडेनने ब्राझीलचे अध्यक्ष डिल्मा रोसेफ यांच्या कोणकोणत्या वैयक्तीक माहितीवर अमेरिकेची नजर होती त्याचा शोध घेण्यास मदत करण्याचे आश्वासन ब्राझील सरकारला दिले आहे व त्याबदल्यात आश्रय मागितला आहे. मात्र या माहितीचा शोध घेण्यात आम्हाला कांहीही स्वारस्य नाही असे सांगून ब्राझील सरकारने स्नोडेनला आश्रय देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लॅटिन अमेरिकेतील मोठा देश असणार्या ब्राझीलच्या अध्यक्षांवर म्हणजेच डिल्मा रोसेफ यांच्या इमेल, सेलफोनवर अमेरिकेच्या वरील संस्थेकडून नजर ठेवली जात असल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिका आणि ब्राझील यांचे संबंध तणावाचे बनले आहेत. या प्रकारचा निषेध करण्यासाठी रोसेफ यांनी त्यांची आक्टोबरमधील नियोजित अमेरिका भेट रद्द केली होती.