नवी दिल्ली – अमेरिकेतल्या पोलिसांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून आपल्याला अट्टल गुन्हेगाराप्रमाणे अटक करावी आणि वाईट वागणूक द्यावी असा कोणताही गुन्हा आपण केलेला नाही, असा स्पष्ट खुलासा अमेरिकेतल्या भारतीय वकिलातीतील उपउच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांनी केला आहे. त्या आपल्या मुलीला शाळेत सोडून परत येत असताना त्यांना अमेरिकेच्या पोलिसांनी रस्त्यावरच अटक केली आणि तुरुंगात अट्टल गुन्हेगारांच्या सोबत ठेवले. या प्रकाराने भारतात खळबळ उडाली आहे.
भारताच्या या भावनेची दखल अमेरिकेने घेतली असून अमेरिकेच्या सरकारने या अटकेच्या संदर्भातील सर्व तपशील तपासून बघण्याचा आदेश वरिष्ठ अधिकार्यांना दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी ही माहिती दिली. भारतासाठी हा विषय संवेदनशील आहे हे आपल्याला मान्य आहे, परंतु देवयानी खोब्रागडे यांच्यावर कारवाई करताना, राजशिष्टाचारानुसार त्यांना देणे असलेल्या सर्व सवलती देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे असे त्या म्हणाल्या.
या वागणुकीमुळे भारतातील लोकांना राग येणे साहजिक आहे, परंतु आता खोब्रागडे यांची अडीच लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सुटका झालेली आहे आणि त्यांना कायद्याच्या सगळ्या सवलती दिल्या जातील, असे मेरी हार्फ यांनी स्पष्ट केले. अशा एखाद्या तुरळक घटनेवरून दोन देशातील संबंधावर काही विपरीत परिणाम होऊ नये, अशी अमेरिकेच्या सरकारची इच्छा असल्याचे मेरी हार्फ म्हणाल्या.