पुण्यात कोकेनच्या व्यापार आणि खपात दहापट वाढ

पुणे – गेले काही दिवस पुण्यात कोकेन या अमली पदार्थाचा खप प्रचंड प्रमाणात वाढला असून कोकेनचा व्यापारही प्रचंड वाढला असल्याचे पुण्याच्या अमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाचे प्रमुख अधिकारी सुनील तांबे यांनी सांगितले. २०१३ मध्ये आजपर्यंत पोलिसांनी ५२२ ग्रॅम कोकेन जप्त केले असून हाच आकडा २०१२ सालात अवघा ४८ ग्रॅम होता असेही त्यांनी सागितले. अमली पदार्थाचे सेवन करणारे तरूण हे बहुदा परदेशी विद्यार्थी आहेत असे सांगून तांबे म्हणाले की  भारतीय बाजारात १ किलो कोकेन ची किंमत १ कोटी रूपये आहे तर हीच किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी रूपये आहे.

पुण्यात येणारे कोकेन हे प्रामुख्याने गोवा व दिल्ली येथून येत असून तेथे हे कोकेन पेरू, बोलिव्हीया आणि ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशांतून येते. कोकेन विकणार्‍यांचे प्रमुख लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी हेच असते. पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय कोकेन ट्रेडर्सबरोबर थेट संधान जुळविल्याचेही तपासात दिसून आले आहे. पुण्यातूनही कोकेनचा व्यापार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हे कोकेन मुंबईला तसेच अन्य देशांतही पाठविले जाते असे तांबे यांनी सांगितले. या प्रकरणात पुणे पोलिसांनी बिहार व उत्तर प्रदेशातील कांही जणांना अटकही केली आहे.

Leave a Comment