माझ्या अटकेमागे भाजपा, नितीश यांचा हात – लालू

पाटणा – चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेले राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी आपल्या अटकेमागे आणि जेलयात्रेमागे भारतीय जनता पार्टी, नितीशकुमार आणि सीबीआय यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला अटक करणारे सीबीआयचे अधिकारी यू.एन. बिश्‍वास यांना निवृत्तीनंतर पश्‍चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

भारतीय जनता पार्टीची यू.एन. बिश्‍वास यांच्यावर मोठी भिस्त होती, म्हणून या पक्षाने केंद्रातल्या आपल्या कार्यकाळात त्यांना एखाद्या राज्याचा राज्यपाल करण्याची सुद्धा तयारी केली होती, असाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. राहुल गांधी यांनी लोकप्रतिनिधींच्या संदर्भातला अध्यादेश केंद्र सरकारला रद्द करायला लावल्यामुळे लालूप्रसाद यादव यांना जेलमध्ये जावे लागले आहे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. परंतु लालूप्रसादांनी आता मात्र राहुल गांधी यांची ती भूमिका योग्यच होती असे तिचे समर्थन केले.

येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार ठरतील, असेही लालूप्रसाद यांनी प्रतिपादन केले. नरेंद्र मोदी हे कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. मी आता तुरुंगाच्या बाहेर आलो आहे तेव्हा मोदींना पंतप्रधान कसा होऊ देईन, असा सवाल त्यांनी केला. नरेेंद्र मोदी यांची तथाकथित लाट केवळ माध्यमांपुरती मर्यादित आहे, असेही ते म्हणाले.