इस्लामाबाद – नवीन कार घेऊन थोडी जरी वापरली आणि ती विकायची ठरविली तर घातलेल्या किमतीपेक्षा कमी किंमतीतच ती विकावी लागते याचा अनुभव बहुतेक कारमालकांना आहे. मात्र पाकिस्तानातील कारमालक याला अपवाद ठरले असून तेथे जुन्या गाड्यांना मूळ किमतीपेक्षा कितीतरी अधिक किंमत मिळत असल्याने जुन्या कार मालकांची चांगलीच चांदी होत आहे.
नव्या कारच्या किंमती वाढल्याने नवीन कार घेणे एकीकडे अवघड बनले आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी रूपयात होत असलेल्या घसरणीमुळे पूर्वी ज्यांनी गाड्या घेतल्या आहेत त्यांच्या गाड्यांना अधिक किंमत मिळते आहे असे चित्र सध्या पाकिस्तानात आहे. त्यामुळे जुन्या गाड्या ही मालकांसाठी चांगली गुंतवणूक ठरली आहे.
२००८ सालच्या होंडा एक्स्कॉर्टला त्याकाळात १७ लाख पाकिस्तानी रूपये मोजावे लागले होते तीच गाडी आज २२ लाखांना विकली जात आहे. २००० सालची सुझुकी मेहरण म्हणजे आपली मारूती ८०० स्पोर्टी टायर व थोडी डागडुजी केल्यानंतर २५ लाखांना विकली जात आहे. विशेष म्हणजे नव्या सुझुकी मेहरणची किमत यापेक्षा कमी आहे मात्र जुन्या गाडीचे इंजिन फारच उत्तम असल्याने त्याला अधिक किंमत देण्यास लोक तयार आहेत असे कार डिलरचे म्हणणे आहे.
पाकिस्तानी चलनाचा ऑगस्टमध्ये डॉलरला १०१ रूपया असा दर होता तो आता डॉलरला ११० रूपयांवर गेला आहे. फॉरिन एक्स्चेंजमध्ये सतत चढउतार होतच आहे व त्याचा थेट परिणाम गाड्यांच्या किमतींवर होत आहे. डिलरच्या सांगण्यानुसार जपानातून गाडी आयात करण्यासाठी यापूर्वी ५ हजार डॉलर्स द्यावे लागत होते त्याऐवजी आता ८ हजार डॉलर्स मोजावे लागत आहेत. यामुळे जुन्या गाड्यांची मागणी वाढत चालली आहे.