कोन चले भाई कोन चले…

‘कोन चले भाई कोन चले, चारा बहाद्दर लालू चले’ अशा घोषणा लवकरच दिल्या जाण्याची शक्यता आहे. कारण चारा घोटाळ्यात हात रंगलेले लालूप्रसाद यादव जामिनावर मुक्त झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर पडून देशभरातल्या जातीयवादी शक्तींना गाढून टाकण्यासाठी आता देशव्यापी दौर्‍यावर निघणार आहेत. त्यांच्या जामिनावरच्या सुटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करावी म्हणून पत्रकारांनी नितीशकुमार यांची भेट घेतली तेव्हा नितीशकुमार यांनी, लालूप्रसाद निर्दोष सुटलेले नाहीत तर जामिनावर सुटलेले आहेत याची जाणीव करून दिली. परंतु जन्मभर लोकांना गुमराह करण्याचा वसा उचललेल्या लालूप्रसादांनी जणू काही आपण आता निर्दोष सुटलो आहोत अशा आविर्भावात सभेत भाषणही केले आणि त्यांच्या सगळ्या आटपटी लटपटींना बळी पडणारे लोक त्यांच्या भाषणात टाळ्या वाजवत गेले. आधीच प्रसिद्धीची नशा चढलेल्या लालूंची नशा या टाळ्यांनी आणि गर्दीने पराकोटीला पोचली असल्यास नवल नाही. अशा नशेमध्ये आपण काय बोलत आहोत याचे भान माणसाला रहात नसते. मुळातच लालूप्रसाद यांचा स्वभाव बेभानपणाचा. त्यातच टाळ्या आणि गर्दीची नशा चढलेली. त्यामुळे आपण बोलत आहोत ते वास्तव आहे की अवास्तव आहे याची काळजी करण्याचे त्यांना कारणच नाही.

भारतातला स्वातंत्र्योत्तर इतिहासातला सर्वाधिक कोडगा नेता कोणता, असा प्रश्‍न विचारून जनमत आजमावले तर लालूप्रसाद यादव शंभर टक्के मतदान घेऊन थेट गिनेज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये जाऊन बसतील. कारण कोडगेपणाच्या बाबतीत लालूप्रसाद यादव याचा हात धरील असा एकही नेता शंभर वर्षात जन्माला आलेला नाही. या गृहस्थाला जनतेच्या पैशावर निर्लज्जपणे डल्ला मारल्याबद्दल शिक्षा झालेली आहे. त्याचा गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध झाला आहे. त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला, काही काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले म्हणून केवळ त्याला राजकारणी म्हटले जाते. परंतु ज्याक्षणी त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला त्याक्षणी तो चोर, दरोडेखोर, खुनी आणि बलात्कारी अशा अट्टल गुन्हेगारांच्या यादीत जमा झालेला आहे. असा माणूस एवढी शिक्षा झाली असून सुद्धा देशामध्ये जातीयवादाशी लढा करण्याच्या गोष्टी बोलतो यामागे त्याच्या कोडगेपणाशिवाय काहीही नाही. खरे म्हणजे लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झालेली आहे आणि खालच्या कोर्टाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळालेली आहे म्हणून ते जामिनावर सुटले आहेत.

ते उच्च न्यायालयात निर्दोष सुटले तर स्वत:ला राजा हरिश्‍चंद्राचा अवतार सुद्धा म्हणवून घेऊ शकतात. पण तूर्तास तरी त्यांना उच्च न्यायालयाने केवळ जामिनावर बाहेर सोडले आहे. त्यांना निर्दोष ठरवलेले नाही. त्यांच्यावरचे आरोप खोटे होते असेही म्हटलेले नाही. तूर्त जामिनावर बाहेर पडलेला एक गुन्हेगार हेच लालूप्रसाद यादव यांचे कायदेशीर स्थान आहे. परंतु जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्यांनी जणू काही आपण निर्दोष सुटून बाहेर पडलो आहोत अशा खोट्या आविर्भावात बोलायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या बेशरमपणाला माध्यमांनी का प्रसिद्ध द्यावी हा प्रश्‍नच आहे. बाहेर पडल्यानंतर लालूप्रसाद यादव मोठ्या डरकाळ्या फोडायला लागले आहेत. आपण देशातल्या जातीयवादाचा खातमा करणार आहोत अशी बढाई ते मारत आहेत. लालूप्रसाद यादव दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पाच वर्षे रेल्वेमंत्री होते. त्या काळात ते आरोपी असून सुद्धा तुरुंगाच्या बाहेर होते. एवढेच नव्हे तर आपल्या देशातल्या काही कायदेशीर तरतुदींमुळे या चोराच्या हातामध्ये जनतेच्या पैशाच्या चाव्या होत्या. या मोकळिकीच्या काळात या गृहस्थाला कधी कथित जातीयवादाशी लढा देता आला नाही. आता मात्र त्यांचा एक पाय तुरुंगात आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे अशा परिस्थितीत मात्र ते जातीयवादाचा खातमा करण्याच्या डरकाळ्या फोडत आहेत.

हे सारे करताना त्यांची स्वत:ची काहीच ताकद नाही. बिहारपुरता मर्यादित असलेला त्यांचा पक्ष कधी शेवटचा श्‍वास घेईल याची शाश्‍वती नाही. परंतु पूर्ण देशात जातीयवादाचा खातमा करण्याच्या वल्गना ते करत आहेत. लालूप्रसाद यादव यांनी जन्मभर जोकरगिरी केली, परंतु जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेल्या या वल्गनांसारखा मोठा जोक त्यांनी आयुष्यात कधी केला नसेल. कधीही हातात बेड्या पडू शकतील असा गुन्हेगार नेता आज अशा गोष्टी बोलू शकतो यापरती लोकशाहीची विटंबना ती काय असेल? लालूप्रसाद यादव यांच्या डरकाळ्यांना कॉंग्रेसचा आधार आहे. कॉंग्रेसचे नेते भ्रष्टाचाराशी लढण्याच्या गोष्टी करत आहेत, परंतु भ्रष्टाचाराने हात रंगलेला एक नेता कॉंग्रेसचे नाव घेऊन जातीयवादाशी लढण्यासाठी उसने अवसान आणत आहे. ही गोष्ट कॉंग्रेसला परवडणारी नाही. परंतु कॉंग्रेसचे नेते सुद्धा योग्य काय आणि अयोग्य काय, यांचा विवेक करण्याच्या मन:स्थितीत नाहीत आणि म्हणूनच अशा भ्रष्टाचारी नेत्याला कॉंग्रेसचे नेते सुद्धा पदरात घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Comment