कॉंग्रेसची ओढाताण

निवडणुकीच्या डावपेचात आपल्या विरोधकांना हतप्रभ करणे फार महत्त्वाचे असते. ज्या गोष्टी केल्याने आपल्या विरोधकांच्या कमतरता प्रकट होणार आहेत त्या गोष्टी त्याला करायला भाग पाडणे ही बाब फार निर्णायक ठरत असते. कॉंग्रेस वाल्यांना राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. पूर्वी ते तसे घोकत होते पण आता भाजपाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींचे नाव जाहीर केले त्यामुळे राहुल गांधी फिके पडतील या भीतीने कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या नावाबाबत मौन पाळले होते. विजयी झाल्यास राहुल गांधींंना पंतप्रधान करणार हे नक्की आहे पण त्याचे नाव आधीच जाहीर केल्यास विजय मिळण्याची शक्यता नाही. अशी कोंेडी झालेल्या कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा टाळली होती पण आता भाजपाने केलेल्या प्रचारामुळे कॉंग्रेसला आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे भाग पडायला लागले आहे. कॉंग्रेस हा देशव्यापी संघटना असलेला आणि जुना पक्ष आहे. केन्द्रासह १६ राज्यात त्याचे आणि त्याच्या मित्र पक्षाचे सरकार आहे. पण तरीही आज हा पक्ष प्रचाराच्या स्तरावर असा भाजपाच्या मागे पडला आहे. कॉंग्रेसचे नेते भाजपाच्या प्रचारावर केवळ प्रतिक्रिया तरी व्यक्त करतात किंवा भाजपाचे अनुकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न तरी करतात.

भाजपाला तोंड देण्यासाठी काय करावे लागेल याची चिंता त्यांना सतावत आहे. आजवर असे कधी झाले नव्हते. राज्या राज्यात विधानसभांच्या निवडणुका होतात तेव्हा अन्य पक्षांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आधीच जाहीर होतात पण कॉंग्रेस तसे कधीच करीत नाही. आजवर अनेकदा तशी मागणी करण्यात आली पण कॉंग्रेसने आपले धोरण कधी बदलले नाही. आता पंतप्रधानपदाबाबत मात्र त्यांना आपले धोरण बदलावे लागणार आहे. किंबहुना तसा विचार पक्षात सुरू झाला आहे. हा भाजपाच्या प्रचाराचा आणि नरेन्द्र मोदी यांच्या मोहिमेचा परिणाम आहे. भाजपाने कॉंग्रेसला आपला दुबळा उमेदवार जाहीर करण्यास भाग पाडले आहे. ते नाव जाहीर झाल्यास पराभवच होणार आहे आणि नाव जाहीर केले नाही तर जनता त्यांना, तुमचा पंतप्रधान कोण असा प्रश्‍न विचारून सतावणार आहेत आणि उत्तर न दिल्यास ही सतावणार आहेत. आजवर कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जनतेला अप्रत्यक्षपणे माहीत होत असे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित नेहरू यांच्या काळात कॉंग्रेस सत्तेवर येणार हेही ठरलेले असे आणि पंतप्रधान कोण होणार हेही जनतेला माहीत असे पण आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार हे आहेत अशी घोषणा कॉंग्रेस पक्षाने कधीच केली नव्हती.

आता मात्र भाजपाने मोदी यांच्या नावाची तशी घोषणा केल्याने त्यांना समाजात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कॉंग्रेसलाही आपला उमेदवार जाहीर करावा लागत आहे. कॉंग्रेसचे नेते खंबीर असते आणि त्यांच्यात आत्मविश्‍वास असता तर त्यांनी आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असती. तसा उमेदवार जाहीर केला नाही तरीही पक्षाला बहुमत मिळणार याची खात्री असती तर कॉंग्रेस पक्षाला अशी भूमिका घेता आली असती पण आता तो आत्मविश्‍वास ढासळला आहे. एका मागे एक पराभव होत आहेत. मोदींना मिळणारा प्रतिसाद बघून आणि चार राज्यातल्या निवडणुकांचे निकाल हा बघून आत्मविश्‍वास अजून ढासळत चालला आहे. म्हणूनच सोनिया गांधी यांनी या निकालांनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपलाही उमेदवार जाहीर केला जाईल असे मान्य केले. तेव्हापासून कॉंग्रेस पक्षात विचार मंथन सुरू झाले आहे. भाजपात पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा यावर मतभेद झाले. अडवाणी आणि मोदी यांच्यात स्पर्धा झाली पण या निमित्ताने हे दिसून आले की, भाजपात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करता येईल अशी दोन नावे आहेत तरी. त्यातल्या कोणाला उमेदवार करायचे यावर वादही झाला.

कॉंग्रेसचे एक बरे आहे. त्यांना तसा काही वाद घालावा लागणार नाही. कारण त्यांचा उमेदवार ठरलेला आहे. कॉंग्रेसला आणि सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. पण प्रश्‍न असा आहे की, त्यांचे नाव जाहीर केले तर लोक त्यांची मोदींशी तुलना करतील. ती तुलना झाली की, मोदी भारी ठरतील अशी भीती कॉंग्रेसला सतावत आहे. एका व्यक्तीचे असे नाव जाहीर करण्याने कॉंग्रेसची पंचायत होणार आहे. अशा वेळी कॉंग्रेस नेत्यांनी आणि त्यांना अनुकूल असलेल्या पत्रकार, समीक्षक आणि निरीक्षकांनी असे नाव जाहीर करणे ही हुकूमशाही आहे असे म्हणून पाहिले पण त्यामुळे त्यांच्या स्वत:शिवाय कोणाचेच समाधान होण्याची शक्यता नाही. आज नरेन्द्र मोदी यांचा प्रभाव कमी करू शकेल असा माणूस कॉंग्रेसकडे नाही. आहेत ते राहुल गांधी. त्यांनाच घोड्यावर बसवण्याचा व्यर्थ प्रयत्न सुरू आहे. त्यालाही काही हरकत नव्हती पण त्यांनी कधीही आपली क्षमता सिद्ध केलेली नाही. त्यांनी कधी मंत्रिपद स्वीकारलेले नाही. कधी संघटना बांधणीत लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात क्षमता आहे की नाही याबाबत मतदारांंना शंका आहेत. कॉंग्रेस पक्षाचे काही समर्थक हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न करीत असतात. आजवर अनुभव नसला म्हणून काय झाले ? राजीव गांधी यांनाही अनुभव नव्हता मग त्यांनी सरकार चालवलेच की नाही ? तसे राहुल गांधीही अनुभवाविना सरकार चालवून दाखवतील असे या लोकांचे म्हणणे आहे. हे म्हणणे बिनतोड आहे असे त्यांचेच मत आहे आणि त्यामुळे त्यांचेच समाधान होत आहे पण त्याने जनतेचे समाधान होणार आहे का हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

Leave a Comment