पुणे – अभिनेता अरमान कोहलीची जामिनावर सुटका झाली आहे. अरमानविरूद्ध दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे हे जामीनपात्र असल्याने, आज दुपारी त्यांचे वकील संजय वांद्रे यांनी शहर पोलीसांकडे गेट जामीनसाठी अर्ज केला. यानुसार सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत दुपारी सव्वा वाजता ५० हजार रुपये रोख आणि दोन प्रतिष्ठीत नागरिकांनी दिलेल्या जामिनावर आरमानची सुटका करण्यात आली.
बिग बॉसच्या सातव्या सीझनमधला स्पर्धक अभिनेता अरमान कोहलीला काल अटक करण्यात आली. बिग बॉसमधून नुकतीच बाहेर पडलेल्या सोफिया हयातने अरमानविरोधात शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला अटक झाली होती.
सोफियाने याबाबतची तक्रार सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण लोणावळ्यातील बिग बॉसच्या घरात झाल्यामुळे लोणावळा पोलिसांकडे हस्तांतरीत केलं. बिग बॉसच्या घरात 4 डिसेंबर रोजी अरमान कोहलीने मारहाण आणि शिवीगाळ केल्याची सोफियाची तक्रार आहे. त्यानंतर पोलिसांनी अरमान कोहली विरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 324, 504 आणि 509 अनुसार गुन्हा दाखल केला होता