अण्णांसाठी यादवबाबा मंदिरातच आयसीयू

पुणे / राळेगण सिद्धी – जनलोकपाल विधेयक संमत व्हावे यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ढासळू लागली असल्याचे समजते. अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांना आयसीयूत दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र अण्णा लोकपाल विधेयक संमत होईपर्यंत उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर अडून राहिल्याने अखेर राळेगणच्या यादवबाबा मंदिरातच अण्णांसाठी ताप्तुरत्या आयसीयूची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

अण्णांच्या सहकारी व माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या संदर्भात बोलताना म्हणाल्या की अण्णांचे वजन कमी झाले आहे तसेच त्यांना अशक्तपणाही खूप जाणवत आहे. उपोषणासाठी मंडपात त्यांना धरून आणावे लागते आहे. डॉक्टरांनी अण्णांच्या मूत्रपिंडावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उपोषण १-२ दिवसांत न सुटल्यास अण्णांच्या प्रकृतीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.यामुळे मंदिरातच ताप्तुरते आयसीयू तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णांच्या तब्येतीची दखल घेऊन दोन्ही संसदेत हे विधेयक त्वरीत मंजूर करावे अशी विनंतीही बेदी यांनी राजकीय पक्षांना केली आहे.

बेदी आज दिल्लीला परतणार होत्या मात्र अण्णांची तब्येत पाहून त्यांनी जाणे रद्द केले आहे. अशा परिस्थितीत अण्णांना एकटे सोडून जाता येणार नाही असे विश्वंभर चौधरी यांनी बेदींना सांगितल्याने त्यांनी जाणे रद्द केल्याचे समजते. दरम्यान अण्णांना उपोषण मागे घ्यावे यासाठी अनेकांकडून फोन येत आहेत मात्र अण्णा आपल्या भूमिकेवरच ताठ राहिले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment