दिल्लीत राष्ट्रपती राजवटीची शिफारस

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींना अहवाल सादर केला असून त्यात अनेक पर्यांयांसोबत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून कळते. दिल्लीच्या नायब राज्यपालांचा अहवाल प्राप्त झाला असून कायद्यान्वये त्यावर चर्चा करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

नायब राज्यपालांनी केलेल्या अनेक शिफारशींपैकी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एक शिफारस त्या अहवालात असल्याचे सूत्रांकडून कळते. नवीन विधानसभा भंग न करता, ती काही काळ निलंबित अवस्थेत ठेवण्याची शिफारस यात आहे. यादरम्यान सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा ठेवला जाऊ शकतो. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी भाजपला ३२, आम आदमी पार्टीला २८ आणि कॉंग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी आवश्यक ३६ चा जादुई आकडा जुळविण्यात एकाही पक्षाला अद्याप यश आलेले नाही.

नवीन सरकार स्थापनेसाठी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली होती. परंतु कुणीही सरकार स्थापन करण्यासाठी तयार नसल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले होते. दिल्लीत सरकार स्थापनेसाठी एकही पक्ष पुढाकार घेत नसेल तर येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता आहे.