मुंबई – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझन यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असला तरी सुझनने पोटगीसाठी दावा केलाच तर रोशन कुटुंबाची ५ हजार कोटींची मालमत्ता पणास लागणार आहे. संपत्तीनुसार पत्नीला पोटगी द्यावी लागते व ही वेळ हृतिकवर आलीच तर आजपर्यंत सर्वाधिक पोटगी देण्याचे रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदले जाईल. म्हणजेच हा सर्वाधिक महागडा घटस्फोट असेल असे सांगितले जात आहे.
२० डिसेंबर २००० या दिवशी हृतिक आणि सुझनचे लग्न झाले होते. हृतिकची स्वतःच्या मालकीची १५०० कोटींची मालमत्ता आहे. वडील राकेश यांचीही त्यांच्या मालकीची २५०० कोटींची मालमत्ता आहे. शिवाय हृतिकचे आजोबा म्हणजे आईचे वडील ओमप्रकाश यांचाही हृतिक हाच वारस आहे आणि त्यांचीही १००० कोटींची मालमत्ता आहे. यात इमारती, बंगले, रॉयल्टी, जाहिरात करार, बंगलोर येथील १०० एकर जमीन व अन्य गुंतवणुकीचा समावेश आहे.
सुसन सध्या ब्रांद्यातील २५ कोटी रूपयांच्या फ्लॅटमध्ये राहते आहे. सिगापूरातील एक व्हीला आणि अंधेरी व बांद्रयातील दोन स्टोअर तिच्या नावावर आहेत. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री संतोष बागरोडिया यांचा मुलगा पुनीत आणि सून सुनीता जालान यांच्या घटस्फोटाच्यावेळी न्यायालयाने सात कोटी रूपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता व ही सर्वाधिक पोटगी होती. आता सुझन हृतिक हे रेकॉर्ड मोडणार का याची उत्सुकता आहे.