लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार निवारण केंद्रे

कामाच्या जागी महिलांना सोसावे लागत असलेले लैंगिक शोषणाचे वाढते प्रकार लक्षात घेऊन भारतीय उद्योग व्यावसायिकांनी या संदभात तक्रार निवारण मंच स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान केली असल्याचे असोचेमच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

गेल्या वर्षी दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा नावाने या संदर्भात स्थापन करावयाच्या तक्रार निवारण मंचासाठी मार्गदर्शक सूत्रे घालून दिली होती. त्यानुसार दिल्लीतील ४९  खासगी उद्योगांनी असे मंच स्थापन केले आहेत. गतवर्षी हा आकडा १६ होता. बंगलोर – ४६, मुंबई ३८,कोलकाता ४२ अशी अन्य शहरातील मंचांची संख्या आहे. असोचेमने या संदर्भात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चंदिगड, डेहराडून,, कोलकाता, बंगलोर इत्यादी १५ शहरात सर्वेक्षण केले.

असे मंच स्थापन करणार्‍यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, बीपीओ, टेलिकॉम, मिडीया, मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्स्टाईल, रियल इस्टेट आणि अन्य १५ क्षेत्रातील उद्योगांचा समावेश आहे. सर्वेक्षणात ३५०० महिलांची मते घेण्यात आली होती. कामावर जाणार्‍या महिलांतील केवळ ३५ टकके महिलांनाच कॅब सुरक्षा उपलब्ध असल्याचेही यात आढळून आले आहे.