रेशन दुकानातून लवकरच स्वाईप मशीन्स

मुंबई – सार्वजनिक वितरण दुकानातून म्हणजेच रेशन दुकानातून होत असलेला काळाबाजार आणि चोर्यांाना प्रतिबंध व्हावा यासाठी बायोमेट्रिक रेशनकार्डनंतर या दुकानातून स्वाईप मशीन्स बसविली जाणार असल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार केंद्राने अन्न सुरक्षा विधेयक संमत केले आहे. परिणामी सरकारी रेशन दुकानातील धान्य कोटा तिपटीने वाढणार आहे. रेशन दुकानातून होत असलेला काळाबाजार व त्यासंदर्भातल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. व त्यामुळे बायोमेट्रिक संगणकीकृत रेशन कार्डे देण्याची योजना राबविली जात आहे. ही रेशनकार्डे पुढील सहा महिन्यात ग्राहकांना मिळणार आहेत. त्यानंतर रेशन दुकानातून स्वाईप मशीन बसविली जाणार आहेत.

लाभार्थी कार्ड घेऊन दुकानात गेला की दुकानदार हे कार्ड स्वाईप मशीनमध्ये घालतील. त्यामुळे संबंधित लाभार्थीला किती धान्य मिळाले, काय दराने मिळाले याचा मेसेज लाभार्थी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी आणि धान्य विभाग मुख्यालयाकडे मोबाईलवर येणार आहे. परिणामी या दुकानातून होत असलेल्या गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.

Leave a Comment