मॉन्ट ब्लँक इमारतीतील आग शॉर्ट सर्किटमुळे

मुंबई – मुंबईच्या केम्स कॉर्नर भागातील मॉन्ट ब्लँक या २६ मजली इमारतीतील बाराव्या मजल्यावर शुक्रवारी लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या आगीत ७ जण मरण पावले आणि त्यांच्या मृत्यूची कारणे पाहिली असता अनेक गोष्टी उघड झाल्या.

बाराव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १२१ मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि त्यानिमित्ताने अनेक ज्वालाग्राही वस्तू, रसायने तिथे आणण्यात आली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर या ज्वालाग्राही वस्तूंनी पेट घेतला आणि घराच्या खिडक्या मोकळ्या असल्यामुळे घरात असलेल्या वार्‍याने आग लवकर पसरली, असे आढळले आहे.

अशी आग लागल्यानंतर तिच्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक अशी साधने तिथेच उपलब्ध असतात. परंतु त्यांचा वापर कसा करावा याची माहिती असण्याची गरज असते आणि ती नसल्यामुळे आगीच्या ठिकाणी हजर असलेले लोक घाबरून गेले. त्यांनी गोंधळून जाऊन नको त्या गोष्टी केल्या. त्यातच सात जण मरण पावले.

हे घर चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांच्या शेजारचे घर आहे. दिनेश गांधी यांच्या पत्नी आग लागली तेव्हा इमारतीच्या खाली बागेत काम करत होत्या. परंतु त्यांना बाराव्या मजल्यावरून धूर येताना दिसला तेव्हा त्या लिफ्टने बाराव्या मजल्यापर्यंत गेल्या. लिफ्टमधून बाहेर येण्यासाठी त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला, परंतु दरवाजा उघडताच आगीचे लोळ लिफ्टमध्ये घुसून त्या आगीने सौ. गांधी यांचाही बळी घेतला आणि लिफ्ट सुद्धा जळून गेली.

बचावात्मक उपायाचे प्रशिक्षण नसणे, साधनांविषयी अज्ञान आणि तारतम्याचा अभाव यामुळे आगही लागली आणि लोकांचे जीव सुद्धा गेले. आग लागल्यावर तिथे काम करत असलेल्या सुताराने आपल्या दोन सहकार्‍यांना आगीचा त्रास होऊ नये म्हणून खोल्यांमध्ये कोंडले, पण उलट कोंडल्यामुळेच ते दोघे मरण पावले.

Leave a Comment