पुरोगामी आणि प्रतिगामी

महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले समाजात नवा मांडत होते तेव्हापासून त्यांचे समर्थन करणारा एक वर्ग होता आणि त्यांच्या परिवर्तनाच्या विचाराला विरोध करणाराही एक वर्ग या समाजात होता. त्यांना ढोबळ मानाने पुरोगामी आणि प्रतिगामी वर्ग असे म्हटले जाते. हे दोन विचार प्रवाह महाराष्ट्राच्या इतिहासात सातत्याने वाहताना दिसतात. काळ बदलला, शिक्षणाचे प्रमाण वाढले, जीवनातला तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढला तरीसुध्दा परिवर्तनास नकार देणारा विचार प्रवाह अजूनही महाराष्ट्रात वेगळ्या रूपात का होईना पण वाहताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अंधश्रध्दा विरोधी विधेयक मंजूर झाले असले तरी ते होतानाच्या काळात, त्याची दोन दशके चर्चा होत असताना आणि विधेयक मंजूर झाल्यानंतरसुध्दा या परिवर्तनाला विरोध करणारा वर्ग अजूनही आपला विरोध लपवू शकलेला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत हे विधेयक मंजूर होत असतानाच केंद्राच्या पातळीवर भारतीय दंड विधान संहितेच्या ३७७ व्या कलमावरून वाद सुरू होता. हे कलम योग्य असून समलिंगी संबंध हे अनैतिक आणि बेकायदा आहेत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आता हा एक कायद्याचा मुद्दा आहे असे आपल्याला वाटते. परंतु समाजामध्ये काही परिवर्तन घडवणारे कायदे येतात. तेव्हा तो केवळ कायद्याचा विषय राहत नाही.

समाजाचे पुरोगामी आणि प्रतिगामी असे दोन वर्ग असतात. पुरोगामी वर्ग बदलाचा आग्रह धरत असतो तर प्रतिगामी वर्ग बदलाचे पाय मागे खेचत असतो. परिवर्तन घडवणारे बहुमतात नसतात. असे अल्पमतातले सुधारक समाजासाठी नवा विचार मांडतात पण तो समाजच त्यांना विरोध करत असतो. आपण आज सांगत असलेल्या गोष्टी या समाजाला उद्या कळणार आहेत हे त्यांना माहीत असते. पण सांप्रतकाळी ते अल्पमतात असतात आणि त्यांना विरोध करणारा समाज बहुमतात असतो. अशा परिस्थितीत काही राजकीय पक्षांना या बहुमताचा मोह होत असतो कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. म्हणून अंधश्रध्दा विरोधी विधेयक मंजूर होत असतानाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षांना बहुमताचा मोह सुटलेला नाही. या दोनही पक्षांनी या विधेयकाला विधानसभेत मान्यता दिली असली तरी अजूनही या पक्षाचे नेते त्याला असलेला आपला विरोध वेगवेगळ्या शब्दात आणि वेगळ्या मार्गांनी व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. समलिंगी संबंधांच्या विधेयकाच्या बाबतीतही अशा गोष्टी घडलेल्या आहेत.

भारतीय संस्कृतीत लैंगिक संबंधांची उघड चर्चा केली जात नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भारतातल्या सगळ्या आमदार खासदारांनी शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याची कल्पना कशी हाणून पाडली होती हे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान संहितेच्या ३७७ व्या कलमाची चर्चा होते ही गोष्टच भारतातल्या अनेक लोकांना मान्य होत नाही. ३७७ वे कलम योग्यच आहे, समलिंगी संबंध ही विकृती आहे असा विचार करणार्‍यांची संख्या भारतात जास्त आहे. त्यांचा विचार कालसुसंगत नाही. कारण लैंगिक संबंधांच्या बाबतीत स्वातंत्र्य देण्याची कल्पना आता जगात मान्य झालेली आहे. भारतात ही कल्पना मान्य करणार्‍यांची संख्या कमी आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयानेसुध्दा ही कल्पना स्वीकारलेली नाही. परंतु त्याने ती स्वीकारायला हवी होती. असे काही लोकांना वाटते. तर्कशुध्दपणे विचार केला तर ३७७ वे कलम चूक आहे. पण भारतामध्ये तर्कशुध्दपणे विचार न करणार्‍यांचे बहुमत आहे. म्हणूनच या विषयावरचा गदारोळ बरेच दिवस चालल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी या कलमाला आपला पाठिंबा दर्शविला आहे आणि अंधश्रध्दा विरोधी विधेयकाप्रमाणेच अतार्किक, प्रतिगामी पण बहुमताच्या विचारामागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रात आपल्या सुदैवाने अशा प्रकारचा विरोध होऊन सुध्दा अंधश्रध्दा विरोधी विधेयक मंजूर झाले आहे. असे विधेयक आल्यामुळे अंधश्रध्दा संपणार आहेत का अशीही चर्चा काही लोक करत आहेत आणि आजवर अशा कायद्यांच्या बाबतीत अशा चर्चा होत आल्या आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर तूर्तास नाही असेच द्यावे लागेल पण आजवरचा अनुभव असा आहे की एका बाजूला हे पुरोगामी कायदे आणि दुसर्‍या बाजूला समाजाचे प्रबोधन असा दुहेरी मारा केल्याशिवाय समाजात परिवर्तन घडत नाही. आज कायद्याला विरोध करणारे लोक, कायदा नको प्रबोधन हवे असे म्हणत आहेत आणि नकळतपणे कायद्याला विरोध करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या ‘प्रबोधन हवे’ या म्हणण्यातून त्यांनी समाजात काही चुकत आहे हे मान्य केलेले असते. म्हणूनच त्यांना प्रबोधन हवे असते. मग जर समाजात काही चुकत असेल तर तर ते प्रबोधनाने दुरूस्त करण्याबरोबरच त्या चुकीला कायद्याने दंडित करायचा प्रयत्न केला तर या मंडळींना वाईट वाटायचे कारण काय हे समजत नाही. या मागे राजकीय स्वार्थ असतो. महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासामध्ये प्रत्येक विषयावर असे दोन विचार प्रवाह असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment