धुळ्यात राष्ट्रवादी, नगरमध्ये त्रिशंकू

धुळे- धुळे-अहमदनगर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. धुळ्यात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर अहमदनगर महापालिकेत मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. धुळे महापालिकेत राष्ट्रवादी ३०, कॉंग्रेस आठ, सेना-भाजप १७, लोकसंग्राम एक आणि अपक्ष १४ ठिकाणी विजयी झाले.

अहमदनगर महापालिकेत कॉंग्रेस आघाडी २९, महायुती २६, मनसे पाच आणि अपक्ष आठ ठिकाणी निवडून आले आहेत. यामुळे येथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून सत्तेची चावी मनसे आणि अपक्षांच्या हातात गेली आहे.

आमदार अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे यांचा पराभव झाला. मागच्या निवडणुकीत धुळ्यात राष्ट्रवादी २२, कॉंग्रेस तीन, शिवसेना १६, भाजप तीन, अनिल गोटे यांचा लोकसंग्राम गटाचे सात, बहुजन समाज पक्ष एक आणि अपक्ष १५ असे निवडून आले होते. रविवारी दोन्ही महानगरपालिकेसाठी मतदान पार पडले. यावेळी धुळ्यात ६० टक्के आणि अहमदनगरमध्ये ७३ टक्के मतदान झाले. धुळे महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी ४६६ उमेदवार, तर अहमदनगर महापालिकेच्या ६८ जागांसाठी ३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Leave a Comment