द्रमुक-कॉंग्रेस युती नाही : करुणानिधी

चेन्नई – येत्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि कॉंग्रेस यांची युती होणार नाही, अशी घोषणा द्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी काल चेन्नईत बोलताना केली. त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक काल झाली. त्या बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसशी युती करू नये असे मत मांडले. त्याच्या अनुरोधाने करुणानिधी यांनी ही घोषणा केली.

एम. करुणानिधी यांनी भारतीय जनता पार्टीशी सुद्धा युती होणार नाही असे जाहीर केले. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात द्रमुकचे नेते ए. राजा हे तुरुंगात आहेत. त्यांच्या पाठोपाठ करुणानिधी यांची कन्या कनिमोळी हिला सुद्धा अटक झाली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कॉंग्रेसने आपल्या या मित्र पक्षालाच जबाबदार धरले. त्यामुळे करुणानिधी नाराज झालेले होतेच.

त्यानंतर कॉंग्रेसने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कनिमोळी हिला राज्यसभेचे सदस्यत्व दिले. परंतु तरी सुद्धा करुणानिधी यांचा राग कमी झालेला नाही आणि त्यातूनच कॉंग्रेसशी असलेली युती तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपला पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवील, असे त्यांनी जाहीर केले. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या भाषणांमध्ये हाच सूर आळवण्यात आला.